गणेशोत्सवासाठी पुणे महापालिकेची नियमावली जाहीर

लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी अनेकजण उत्सुक , महापालिकेकडे परवाना घेण्यासाठी अर्ज

    पुणे  : आता पुणे महापालिकेने गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करण्यासाठी अनेकजण उत्सुक आहे. पुण्यात दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.

    उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा नसावी. ४० फुटापेक्षा उंच मंडप असेल तर अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून गणपती मंडळांना करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षी ज्यांच्याकडे परवाना नाही किंवा जागेत बदल केला आहे, अशा मंडळांनी महापालिकेकडे परवाना घेण्यासाठी अर्ज करावा, असंही सांगण्यात आलं आहे.

    विशेष बाब म्हणजे, गणपती उत्सवासाठी घेण्यात येणाऱ्या परवान्यांसाठी महापालिकेतर्फे कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान, परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्‍यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास, उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी परवाना रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

    -अशा आहेत नियमावलीतील तरतुदी

    -मागील वर्षांपासून पुढील ५ वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, रनिंग मंडपासाठी दिलेल्या परवानग्या ग्राह्य धरणार.
    ज्या मंडळांना नव्याने गणेशोत्सव साजरा करायचा आहे, २०१९ मधील परवानगीची जागा प्रकल्प बाधित झाल्याने किंवा इतर कारणास्तव बदल केला जात असेल तर नवीन जागेवर सर्व परवानग्या घेणे आवश्‍यक.
    -२०१९ च्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार संबंधित क्षेत्रीय कार्यालय, पोलिस ठाण्याकडून या सर्व परवाने घेणे बंधनकारक राहील. या परवान्यांसाठी महापालिकेतर्फे कोणतेही परवाना शुल्क आकारले जाणार नाही.
    -सर्व गणेश मंडळांनी २०१९ च्या किंवा नव्याने घेतलेल्या परवान्यांची प्रत मंडप, कमानींच्या दर्शनी भागावर प्लास्टिक कोटिंगमध्ये दर्शनी भागात लावावी.
    -उत्सव मंडपाची उंची ४० फुटापेक्षा नसावी. ४० फुटापेक्षा उंच मंडप असेल तर अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे.
    -मंडप, स्वागत कमानी उभारताना अग्निशमन, रुग्णवाहिका, प्रवासी बस जाण्यासाठी लगतचे रस्ते मोकळे ठेवावेत, कमानीची उंची १८ फुटापेक्षा ठेवावी.
    -आवश्यकतेनुसार स्वयंसेवक / सुरक्षारक्षक नेमावेत. शाडूच्या गणेश मूर्तींना प्राधान्य द्या.
    -संस्था,संघटना, मंडळांनी, नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये योगदान द्यावे.
    -उत्सव संपल्यानंतर सर्व गणेश मंडळांनी ३ दिवसांचे आत मांडव, देखावे, कमानी उतरवून घ्याव्यात, रस्‍त्यावरील साहित्य ताबडतोब हटवावे.
    -रस्त्यावर घेतलेले खड्डे स्वखर्चाने सिमेंट कॉन्क्रेटमध्ये बुजवून टाकणे बंधनकारक आहे.
    -परवाना दिलेल्या जागेची महापालिकेला आवश्‍यकता भासल्यास किंवा त्या जागेबाबत वाद निर्माण झाल्यास परवाना उत्सव सुरु होण्याच्यापूर्वी रद्द करण्याचा अधिकार महापालिकेला आहे.
    -मांडव, कमानींसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे आवश्‍यक आहे.
    -ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची मंडळानी दक्षता घ्यावी.