दुष्काळी भागाचा शिक्का पुसला जाणार; जिहे कटापूर योजना पूर्णत्वाचे श्रेय आमदार गोरेंना

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिहे कटापूर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला येत्या २१ फेब्रुवारीला माण तालुक्यातील आंधळी धरणावरील पाणी पूजनाला येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक ऐतिहासिक विषयाला उजाळा मिळाला आहे.

  दहिवडी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिहे कटापूर योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला येत्या २१ फेब्रुवारीला माण तालुक्यातील आंधळी धरणावरील पाणी पूजनाला येत आहेत. या अनुषंगाने तालुक्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून, दौऱ्याच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक ऐतिहासिक विषयाला उजाळा मिळाला आहे.

  माण तालुक्यातील पिण्याचे व शेती सिंचनाचा पाणी प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचा मार्गी लागत असताना याचे सर्व श्रेय आमदार जयकुमार गोरे यांना जात आहे. या जनतेचा हा प्रश्न सोडविताना या तालुक्यावरील निसर्गनिर्मित व मानवनिर्मित असे असलेले ‘दुष्काळी’ शिक्के पुसण्याचा बहुमान मिळवत नवा इतिहास रचल्याची चर्चा सुरु आहे.

  ब्रिटिश राजवटीत माण तालुक्यावर ‘NO MAN’S LAND’ हा गोऱ्या इंग्रजांनी शिक्का मारून इथल्या मातीत मनुष्य वसाहतीस पोषक वातावरण नसल्याचे त्या काळी जाहीर करून टाकले होते. तरी सुध्दा या मातीतला माणूस दुष्काळी सावटावर म्हणजे निसर्गावर मात करत, पिढ्यानपिढ्या प्रतिकूल परिस्थितीत जगत आहे. माण-खटाव तालुक्याचा भूभाग हा भौगोलिक दृष्ट्या चोहोबाजूने डोंगर माथ्यावर आहे, तसं पाहता या भागात जिल्ह्यातील नजीक नद्यातील पाणी चढावर पाणी आणणे आर्थिकदृष्ट्या फार जिकीरीचे होते.

  माण-खटाव तालुक्यातील तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती हटविण्याच्या दृष्टीने वेळोवेळी पावले उचलली. त्यातून उरमोडी, जिहे कटापूरसारख्या पाणी उचलून आणण्याच्या महा-खर्चिक योजनांचा जन्म झाला. सुरूवातीच्या काळापासूनच या योजना अनेक संकटाच्या खाईत अडकल्या गेल्या. यात प्रामुख्याने निधी उपलब्ध होण्यात व करण्यात निधी अभावी या योजना रखडल्या गेलेल्या पाहायला मिळाले आहे.

  निसर्गाचा दुष्काळी, ब्रिटिशांचा ‘No man’s Land’, अन या योजना होत असताना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘पुनर्वसनचा शिक्का’ ठोकला गेला. या दुष्काळी भागावर अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिक्कामोर्तब झाले असल्याचे पाहायला मिळते.

  उरमोडी, जिहे कटापूर योजनेचा जन्म नव्वदीचा दशकात झाला, इथला शेतकरी दुहेरी संकटात सापडला, शासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता शेतकर्यांच्या जमिनी काढून घेतल्या, शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुनर्वसनचे शिक्के पडले जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले, योजनाच पूर्ण होत नसल्याने पाणी आले नाही, त्यात दुष्काळी परिस्थिती कायम राहिली. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढच होत राहिली. माण खटावच्या या दुष्काळी भागाच्या जीवनमरणाच्या पाणी प्रश्नावर जयकुमार गोरे यांनी २००९ विधानसभेची निवडणूक लढवली अन् पाणी प्रश्नाच्या जोरावर ते आमदार होऊन विधानसभेत गेले. केवळ पाणी प्रश्नावर त्यांना जनतेने निवडून दिल्याचे पाहायला मिळाले.

  आमदार झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी तत्कालीन शासनाच्या माध्यमातून उरमोडी पाणी योजनेसाठी प्रयत्न करून वेळोवेळी लागणाऱ्या निधी खेचून आणण्याचे काम करीत उरमोडी योजना मार्ग लावण्यात यश मिळवले. तर जमिनीवरील असलेले जमीन अधिग्रहनासाठीचे पुनर्वसन शर्त हटवून हा मानव निर्मित शिक्का पुसण्याचे काम केले.

  जिहे कटापूर योजना सातत्याने निधी अभावी रखडत चालली होती, त्यात राजकीय सत्ता बदलाच्या ग्रहणात अडकत असताना ही योजना पूर्ण होण्याची शंका बळावत चालली होती.योजना पूर्णत्वास आणतांना आमदार जयकुमार गोरे यांनी या शर्यतीमधील अडथळे पार केले असल्याचे पाहायला मिळाले. अखेर जिहे कटापूर योजना पूर्ण होऊन कृष्णेचे पाणी वर्धनगड घाटातून घाट माथ्यावरील नेर धरणात पाणी आणून सोडले.

  नुकताच नेर तलाव ते आंधळी धरणापर्यंतचा चौदा किलोमीटरचा बोगदा पूर्ण होऊन पाणी आले. याला जयकुमार गोरे यांच्या आमदारकीचा चौदा वर्षाचा कालावधी गेल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. आता या योजनेचा शुभारंभ आंधळी धरणातील जलपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते होऊन आमदार जयकुमार गोरे व माणदेशी जनतेसाठी नवा इतिहास रचला जाणार आहे. एकंदरीत या योजनेच्या शुभारंभाने माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेवटचा दुष्काळ होऊन ‘दुष्काळी शिक्का’ पुसला जाणार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.