
अधिवेशन म्हणजे केवळ जनतेच्या पैशांची नासाडी असून, यातून जनतेच्या समस्या मांडल्या जाणे अपेक्षित असताना, लोकप्रतिनिधी आपपासात वादविवाद घालत सभागृहाचा वेळ वाया घालत आहेत, यामुळं अधिवेशन न घेतले तर जनतेचे पैसे तरी वाचतील असं...
कोल्हापूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे पहिलेच अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात सर्वसामान्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे, महिलांचे, तरुणांचे, बेरोजगारांचे प्रश्न व समस्या मांडले जात असतात. मात्र या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक विविध मुद्द्यावरुन आमनेसामने येत कुरघोडी व सूडाचे राजकारण करताना दिसत आहेत. हिवाळी अधिवेशनात सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा हे मुद्दे असतानाच, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण सत्ताधाऱ्यांनी लावून धरले आहे. यावरुन विरोधक व सत्ताधारी यांच्यात खडाजंगी सुरु असून, शुक्रवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता.
दरम्यान, जनता आपल्या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून देते, मात्र लोकप्रतिनिधी सभागृहात ऐकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहेत. यावरन जनतेतून संतापाची लाट निर्माण होत असताना, आता यावर भाजपाचे माजी खासदार व मराठा आरक्षणाचे नेते छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी जोरदार टिका केली आहे. अधिवेशन म्हणजे केवळ जनतेच्या पैशांची नासाडी असून, यातून जनतेच्या समस्या मांडल्या जाणे अपेक्षित असताना, लोकप्रतिनिधी आपपासात वादविवाद घालत सभागृहाचा वेळ वाया घालत आहेत, यामुळं अधिवेशन न घेतले तर जनतेचे पैसे तरी वाचतील, असं म्हणत नेते छत्रपती संभाजीराजे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे.
अधिवेशनाचा सोमवारी देखील वादळी ठरण्याची शक्याता आहे. एसआयटी चौकशी, सीमावाद, नागपूर न्यास जमीन विक्री घोटाळा, सुशात सिंग राजपूत व दिशा सालियान मृत्यू प्रकरण, आदित्य ठाकरे चौकशी यानंतर आता ठाण्यातील परमार बिल्डर आत्महत्या प्रकरण आणि ‘एयू’ प्रकरण अधिवेशनात गाजत असताना, आता ‘ईएस’ यावर देखील उद्या विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक सरकारने ठराव मांडल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार देखील कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मांडण्याची शक्यता आहे. यावर सोमवारी सरकारला ठराव मांडण्यास भाग पाडू असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं अधिवेशनातील दुसरा आठवडा म्हणजे सोमवार देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.