मलवाहिन्यांची सफाई वीस वर्षानंतर होणार, वाहिन्या ५० टक्के गाळाने भरलेल्या

मुंबईत अंदाजे दोन हजार २६ किमी इतक्या लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्यांचे जाळे आहे. या मलवाहिन्यांमध्ये ९०० मिमीपेक्षा जास्त व्यासाच्या (मनुष्य प्रवेश शक्य असलेल्या) १३८ किमी लांबीच्या मलवाहिन्या समाविष्ट आहेत. दक्षिण मुंबईतील मलवाहिन्यांमधून ५० ते ६० टक्क्यांपर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे या वाहिन्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत.

  मुंबई – दक्षिण मुंबईतील काही भागातील मलवाहिन्यांची गेल्या वीस वर्षांपासून साफसफाई झालेली नसल्याने या मलवाहिन्या ५० टक्के गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे मलजलाचा निचरा होण्यास विलंब लागतो. अनेकदा मलवाहिन्या तुंबून मलजल रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना या समस्येला अनेकवेळा सामोरे जावे लागते आहे. पालिकेकडे याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने लक्ष वेधले आहे. त्यामुळे येथील मलवाहिन्यांची साफसफाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

  मलवाहिन्यांची जीआरपी लायनिंग पद्धतीने पुनर्बांधणी करण्यात आली आहे. ही पुनर्बांधणी सन २००१ ते २००४ मध्ये करण्यात आली आहे. पॉवर बकेट या यंत्रसामुग्रीद्वारे जीआरपी लायनिंगची साफसफाई करता येत नाही. तसेच मनुष्य प्रवेश करून मलवाहिन्या साफसफाई करण्यास बंदी आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, खेतवाडी रोड, मौलाना शौकत अली रोडवरील मलवाहिन्या साफ सफाई करण्यात आलेल्या नाहीत. गेल्या वीस वर्षापासून साफ सफाई रखडल्य़ाने मलवाहिन्यांमध्ये असलेल्या गाळाचे प्रमाण वाढले असून हा गाळ घट झाला आहे.

  गाळामध्ये प्लास्टिक, कपडे, चिंध्या, झाडांच्या फांद्या असल्यामुळे गाळ काढणे शक्य होत नाही. पालिकेकडे सध्या असलेल्या सक्शन कम जेटिंग मशीन या ६०० मिमी व्यासापर्यंतच्या मलवाहिन्यांची साफसफाई करण्यासाठी सक्षम आहेत. त्यापेक्षा मोठ्या मलवहिन्यामधील गाळ उपसण्यासाठी या मशीन उपयोगी नाहीत. त्यामुळे पालिकेने सक्शन कम जेटिंग रिसायकलिंग मशीन व जास्त क्षमता असलेल्या सुपरसकर मशीनद्वारे गाळ काढण्याचा निर्णय घेतला आहे.

  मुंबईत अंदाजे दोन हजार २६ किमी इतक्या लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्यांचे जाळे आहे. या मलवाहिन्यांमध्ये ९०० मिमीपेक्षा जास्त व्यासाच्या (मनुष्य प्रवेश शक्य असलेल्या) १३८ किमी लांबीच्या मलवाहिन्या समाविष्ट आहेत. दक्षिण मुंबईतील मलवाहिन्यांमधून ५० ते ६० टक्क्यांपर्यंत गाळ साचला आहे. त्यामुळे या वाहिन्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत.

  -आठ कोटींवर येणार खर्च 
  पहिल्या टप्प्यात या मलवाहिन्या साफ करण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेला सुमारे आठ कोटी दहा लाख ५९ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. या कामामुळे मलजलाचा निचरा जलद गतीने होईल. असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले,