लोकसभेसाठी शिंदे गटाचं ठरलं; १८ जागांची मागणी भाजप मान्य करणार?

शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्यानेच शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने १८ जागांवर दावा केला असला तरी भाजप एवढ्या जागांची मागणी मान्य करणे कठीण असल्याचे भाजपच्या एकूणच भूमिकेवरून स्पष्ट होते. शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्यानेच शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (२६ फेब्रुवारी) संसदेच्या उभय सभागृहात खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लढवण्यात आलेल्या २२ जागांचा आढावा घेण्यात आला.

    गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर विजय मिळवला होता. आगामी लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने १८ जागांवर उमेदवार द्यायला हवे, अशी आग्रही मागणी खासदारांकडून करण्यात आली.

    पक्षाचे खासदार असलेल्या जागा मित्र पक्षांसाठी सोडू नयेत, अशी भूमिकाही शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. त्याचबरोबर जागावाटप लवकर निश्चित करावे, म्हणजे प्रचाराला सुरुवात करता येईल, असंही खासदारांनी यावेळी म्हटलं.

    शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे. कारण, भाजपने लोकसभा निवडणुकीत शिंदेला फक्त १३ जागाच सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरू शकतो.