
शिवाजीनगर भागात आढळून आलेल्या त्या व्यक्तीच्या मृत्यूचा खरा प्रकार उघडकीस आणत शिवाजीनगर पोलिसांनी एका रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. रिक्षाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तबल 250 ते 300 सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्याची उकल केली आहे.
पुणे : शिवाजीनगर भागात आढळून आलेल्या त्या व्यक्तीच्या मृत्यूचा खरा प्रकार उघडकीस आणत शिवाजीनगर पोलिसांनी एका रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. रिक्षाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी तबल 250 ते 300 सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्याची उकल केली आहे.
सुनिल उर्फ बाळू चव्हाण (वय 54, रा. गणेश पेठ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर, अक्षय प्रशांत चव्हाण (वय 25, रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई परिमंडळ एकचे उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहाय्यक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक निरीक्षक बाजीराव नाईक, भोलेनाथ अहीवळे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
काँग्रेस भवनसमोर गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्याला पट्टी होती. त्याला जखम झालेली होती. त्यामुळे पोलिसांना संशयास्पद गोष्टी आढळून आल्या होत्या.
दरम्यान, मृतदेहाची ओळख मात्र पटत नव्हती. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर त्याचे नाव सुनिल उर्फ बाळू चव्हाण असल्याचे समजले. यानूसार पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व चौकशी केली. त्यावेळी सुनिल हा मित्रांसोबत बाहेरगावी फिरण्यासाठी गेला असल्याचे समजले.
पोलिसांनी संबंधित मित्रांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, रेल्वे स्थानक येथे आल्यानंतर तो तेथून अचानक गायब झाला. तो घरी गेला असावा असा संशय आल्याने आम्ही त्याबाबत चौकशी केली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी करण्यास सुरूवात केली
रेल्वे स्थानक व तेथपासून शिवाजीनगर भागातील तब्बल जवळपास 300 सीसीटीव्ही तपासले. त्यात काँग्रेस भवनाच्या समोर एका रिक्षाने सुनिलला धडक दिल्याचे आढळून आले. लागलीच पोलिसांनी या रिक्षाचा शोध सुरू केला.
दुसऱ्या एका ठिकाणी या रिक्षाचा क्रमांक मिळाला. त्यानूसार त्याचा शोध घेत असताना रिक्षा खडकी रेल्वे स्थानक परिसरात आहे, अशी माहिती मिळाली. तात्काळ पोलीस पथकाने याठिकाणी सापळा लावून अक्षय याला पकडले. चौकशी केली असता त्याने धडक दिल्याची कबूली दिली. त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे. पोलिसांनी केवळ 12 दिवसांत या मृत आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तींच्या मृत्यूचा प्रकार समोर आणला आहे.