वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ६ दुचाकी जप्त; गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई

पुणे शहरातील विविध भागातून वाहन चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांच्या चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

    पुणे : पुणे शहरातील विविध भागातून वाहन चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांच्या चोरीच्या ६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वारजे ब्रिज परिसरात दरोडा व वाहन चोरीविरोधी पथक एकने ही कारवाई केली आहे.

    कार्तिक दत्तात्रय द‌ळवी (वय २०, रा. पौड, मुळशी) व दिगंबर उर्फ दिनु अंकुश आंब्रे (वय २६, रा. अप्पर इंदिरानगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोथरूड, फरासखाना, खडक व हवेली, लष्कर या पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.

    ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक शाहीद शेख, प्रदीप राठोड व त्यांच्या पथकाने केली आहे.

    शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दरवर्षी वाहन चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना वाहन चोरट्यांवर नजर ठेवून त्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एकचे अधिकारी व कर्मचारी कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तेव्हा पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महेश पाटील व श्रीकांत दगडे यांना त्याच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुचाकी चोरणारे दोघे वारजे ब्रिज परिसरात थांबलेले आहेत.

    त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याचा तपास केला असता त्यांनी दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यांना ताब्यात घेऊन सखोल केला असता त्यांच्याकडून आणखी ६ गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी १ लाख ४० हजार रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.