भोरमध्ये अज्ञान चोरट्यांचा धुमाकूळ; 3 महिलांच्या पर्स हिसकावून 30 हजारांहून अधिक मुद्देमाल लंपास

भोर तालुक्यातील आंबाडे- मांढरदेवी मार्गावर चालू गाडीवरील एका महिलेची तर दोन महिलांची भोर शहरात पर्स हिसकावून अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गणेश प्रतिष्ठापना मंगळवार (दि.१९ ) घडली.

    भोर : भोर तालुक्यातील आंबाडे- मांढरदेवी मार्गावर चालू गाडीवरील एका महिलेची तर दोन महिलांची भोर शहरात पर्स हिसकावून अज्ञात चोरट्यांनी 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गणेश प्रतिष्ठापना मंगळवार (दि.१९ ) घडली. अज्ञात चोरट्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या बुलेटवरून दोन अनोळखी इसमानी आंबाडे- मांढरदेवी मार्गावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे समोर चालू गाडीवरील वनिता आनंदा तुपे (रा. वरवडी) यांच्या हातातील सोनेरी रंगाची पर्स पळवली. तर भोर शहरातील चौपाटी येथे सुवर्णा तानाजी माने ( रा. बालेवाडी पुणे) यांच्याकडील काळ्या रंगाची पर्स तसेच हिना तोसीब शेख ( रा. शिवशक्ती नगर सातारा) त्यांच्याकडील गुलाबी पर्स पळवून, असा एकूण 30 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम लंपास केली.

    गणेशोत्सव काळात लागोपाठ दोन दिवस चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. अज्ञात इसमावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, हवालदार उद्धव गायकवाड, वर्षा भोसले तपास करीत आहेत.