रावेत बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढणार ; सर्वेक्षण, माती परीक्षणानंतर फोडणार खडक

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने बंधाऱ्याची साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच बंधारा बांधून अनेक वर्ष झाली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले आहे. यानंतर बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी महापालिका बंधाऱ्यातील खडकही फोडणार असल्याने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

  पिंपरी : पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने बंधाऱ्याची साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. तसेच बंधारा बांधून अनेक वर्ष झाली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले आहे. यानंतर बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी महापालिका बंधाऱ्यातील खडकही फोडणार असल्याने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

  पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पवना नदीवरील रावेत बंधारा येथून पाणी उचलून महापालिका प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्द करून नागरिकांना वितरित केले जाते. मात्र, रावेत बंधाऱ्यामध्ये नदीतून पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. बंधारा बांधून अनेक वर्ष झाली आहेत.

  -१० लाख पाटबंधारे विभागाकडे जमा
  महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे सर्वेक्षण केले आहे. त्यानंतर महापालिकेने बंधारा परिसरातील मातीचे परीक्षण करण्यासाठी १० लाख रूपये नुकतेच पाटबंधारे विभागाकडे जमा केले आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत माती परीक्षण होईल. त्यानंतर बंधाऱ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी खडक फोडण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

  -शिवणे, गहुंजे बंधाऱ्याचे काम सुरू
  रावेत बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलत आहे. मात्र, पवना नदीतून पाणी येताना वरच्या काही गावातून दूषित पाणी पवना नदीत थेट सोडले जात आहे. त्यामुळे अशुध्द पाणी उपसा करून ते शुध्द करून नागरिकांना पिण्यास देण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने शिवणे आणि गहुंजे भागात शुध्द पाणी असलेल्या ठिकाणी कोल्हापूर पध्दतीचा बंधारा उभारण्याची मागणी केली होती. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी करून या दोन्ही बंधाऱ्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामकाजही सुरू झाले आहे.