आंदाेलनातून लाेकसभेची साखरपेरणी! हातकणंगले मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी माेर्चेबांधणी

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला किती यश मिळाले, हा काही संशोधनाचा विषय आहे. मागणी १२०० कोटी रुपयांची आणि तडजोड झाली जेमतेम दोनशे कोटी रुपयांच्या आसपास! त्यांच्या या लढ्याच्या यश आणि अपयशाची चर्चा किंवा विश्लेषण हे लोकसभा निवडणुकांचे ढोल वाजेपर्यंत केले जाणार आहे.

  दीपक घाटगे, कोल्हापूर :  राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उभा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लढ्याला किती यश मिळाले, हा काही संशोधनाचा विषय आहे. मागणी १२०० कोटी रुपयांची आणि तडजोड झाली जेमतेम दोनशे कोटी रुपयांच्या आसपास! त्यांच्या या लढ्याच्या यश आणि अपयशाची चर्चा किंवा विश्लेषण हे लोकसभा निवडणुकांचे ढोल वाजेपर्यंत केले जाणार आहे. लोकसभा निवडणूक समोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुगर बेल्टमध्ये विशेषता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरू केले होते. आता या त्यांच्या आंदोलनाचे दृश्य परिणाम प्रत्यक्ष निवडणुकीत दिसून येणार आहेत.

  स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या किमान सहा जागा स्वबळावर लढवणार आहे. सुरुवातीला स्वाभिमानीचा कल हा महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा होता. पण नंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवणार आहेत. याच मतदार संघातून धैर्यशील माने, जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील, शिवाय वंचित आघाडी असे काही जण निवडणूक रिंगणात असणार आहेत. या मतदारसंघात शिराळा आणि वाळवा हे सांगली जिल्ह्यातील दोन तालुके येतात. हा मतदारसंघ शुगर बेल्टमध्ये येतो. त्याचा फायदा घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांचे आंदोलन उभे केले होते. साखर उत्पादक ऊस उत्पादकांवर अन्याय करतात, हे चित्र या लढ्यातून निर्माण करण्याचा राजू शेट्टी यांनी प्रयत्न केला आहे. प्रतिक पाटील साखर उत्पादकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे राजू शेट्टी यांचा अंगुलीनिर्देश आहे.

  या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर चालते. स्वाभिमानी हा राजकीय पक्ष असला तरी ऊस उत्पादक हे अनेक राजकीय पक्षात विभागले गेलेले आहेत. पण राजू शेट्टी यांना समर्थन देणारा मोठा वर्ग ऊस उत्पादकांचा आहे हे नाकारता येणार नाही.कारण ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर चांगले पैसे जमा होण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. पूर्वी साखर कारखानदार देतील ते घ्यायचे अशी अवस्था ऊस उत्पादकांची होती हे चित्र गेल्या वीस वर्षात बदलले आहे.स्वाभिमानी हा राजकीय पक्ष असला तरी ऊस उत्पादक अनेक राजकीय पक्षात विभागले गेलेले आहेत. पण राजू शेट्टी यांना समर्थन देणारा मोठा वर्ग ऊस उत्पादकांचा आहे, हे नाकारता येणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राजू शेट्टी यांचा मोठा पराभव झाला होता. त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील काही चुका सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यंदाच्या हंगामात प्रति टन साडेतीन हजार रुपये मिळावेत ही मागणी ही त्यांनी सोडून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनातला गुलाल उधळण्या इतके यश मिळाले असे म्हणता येणार नाही.

  वातावरण अनुकूल करण्याचा प्रयत्न
  गत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते यंदा लोकसभेच्या रिंगणात मोठ्या निर्धाराने उतरणार आहेत. शिवसेना फुटल्यामुळे या मतदार संघातील हिंदुत्ववाद्यांची मते विभागली जाणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही फाटाफूट झाल्यामुळे त्यांचीही ताकद क्षीण झाली आहे. वंचित आघाडीचा प्रभाव आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. निवडणूक तिरंगी चौरंगी होण्याची शक्यता आहे. हे सर्व वातावरण स्वाभिमानीसाठी अनुकूल करण्याचा प्रयत्न म्हणजे ऊस उत्पादकांचे उभे केलेले आंदोलन आहे.

  मागणी १२०० काेटी, तजजाेड २०० काेटीवर
  सुमारे दोन महिने चाललेल्या या आंदोलनात आपण साखर कारखानदारांना वाकवू. त्यांना मागण्या मान्य करण्यास भाग पाडू. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करून देऊ असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच त्यांनी आंदोलन तापवत ठेवले. पण त्यांनाच नरमाईची भूमिका घ्यावी लागली. शेतकऱ्यांना बाराशे कोटी रुपये मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देणाऱ्या राजू शेट्टी यांना अवघ्या २०० कोटी रुपयांवर तडजोड करावी लागली.