लघुशंकेला जातो म्हणाला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन संशयित आरोपी पळाला

कुर्डुवाडी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला (Suspect Accused) नेवासे येथून अटक करुन आणल्यानंतर लघुशंकेचे कारण देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस ठाण्याच्या आवारातून भिंतीवरुन उडी मारुन पळाला.

    कुर्डुवाडी : कुर्डुवाडी पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला (Suspect Accused) नेवासे येथून अटक करुन आणल्यानंतर लघुशंकेचे कारण देत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिस ठाण्याच्या आवारातून भिंतीवरुन उडी मारुन पळाला. ही घटना गुरुवारी (दि.९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. राहुल मरगळ माळी (वय २५ रा.नेवासे) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी राहुल मरगळ माळी व इतर दोघे दशरथ मरगळ माळी व दत्ता मरगळ माळी हे आपल्या कुटुंबासह कुर्डू (ता.माढा) येथील फिर्यादी तुकाराम विष्णू पायगण यांच्या शेतात गेल्या दहा महिन्यांपासून आठवडा पगारीवर कामाला होते. शेतातील खोल्यांध्ये त्यांची राहण्याची सोय केली होती.

    रविवारी (दि.५) सर्व आरोपी पायगण यांचा शेतातील शेती अवजारांसह पायगण यांचा टमटम (एमएच ४५ टी २२७९) असे एकूण ३ लाखांचे साहित्य घेऊन पळून गेले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पायगण यांनी ६ जूनला दिलेल्या फिर्यादीवरुन सदर संशयित आरोपींना त्यांच्या पत्त्यावरुन नेवासे येथून अटक करुन कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आणले होते.

    दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास अटक केलेल्या संशयित आरोपीमधील राहुल मरगळ याने लघुशंकेचे कारण सांगून पोलिसांच्या हाती तुरी देऊन भिंतीवरून उडी मारून पळून गेला. दिवसाढवळ्या पोलिसांच्या हातून संशयित आरोपी पळून गेल्याने पोलिसांची नाचक्की झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.