श्रीकांत शिंदेंची दिसली हळवी बाजू! प्रचार रॅलीत रुग्णवाहिनीला करुन दिली मोकळी वाट

कल्याण पूर्वेत महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीला रेकॉर्डब्रेक गर्दी

    कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रॅलीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिनीला महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाट मोकळी करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.

    लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सर्वत्र धूम सुरू असून सर्व उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली, बाईक रॅली, मतदारांशी संवाद असे विविध पर्याय अवलंबत आहेत. कल्याण पूर्वेत देखील आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार रॅलीचे आयोजन केले होते. कल्याण पूर्वेतील श्रीराम टॉकीज येथून सुरू झालेली ही रॅली खडगोळवली मार्गे आंबेडकर चौक, शिवाजी चौक, राजाराम चौक मार्गे चिंचपाडा रोड येथे रॅली आली असता याठिकाणी एक रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकली होती. ही बाब श्रीकांत शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी माईकवर अनाउन्समेंट करत कार्यकर्त्यांना त्या रुग्णवाहिनीला रस्ता करून देण्याच्या सूचना केल्या. यामुळे भर प्रचारात देखील श्रीकांत शिंदे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले.

    लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रचार सुरू करत प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आज कल्याण पूर्व भागात महायुतीची प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्ते आणि नागरिकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली. कल्याण पूर्वेतील शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. तर ठिकठिकाणी डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले गेले. जेसीबीतून फुलांचा वर्षाव अन् फटाक्यांची आतिषबाजी केली.

    या रॅलीत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे, आगरी समाजाचे नेते गुलाब वझे, माजी नगरसेवक निलेश शिंदे, प्रशांत काळे, नवीन गवळी, माधुरी काळे, कस्तुरी देसाई, विकी तरे, मोनाली तरे, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश सरचिटणीस कौस्तुभ देसाई, मनसे उपशहराध्यक्ष योगेश गव्हाणे, अनंता गायकवाड, संदीप नावगे, भारत सोनावणे, शिवसेनेचे संदीप माने, राजू उजगिरे, अनु डोंगरे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान कल्याणकरांच्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकदेखील उत्साही होते. लोकं खिडकीतून, रिक्षांमधून, बाईकवरून रस्त्यावरून सगळीकडून जो विश्वास देत होते. आम्ही तुमच्याबरोबर, युती बरोबर आहोत. सगळे समाज महायुतीला पाठिंबा देत आहेत. ज्याप्रकारे गेली १० वर्षात कल्याण पूर्वेत डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवून लोक महायुतीला पाठिंबा देत आहेत. येणाऱ्या काळात महायुती कल्याणची सीट मोठ्या फरकाने जिकंताना आपण पाहाल असे यावेळी श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.