हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस देखील वादळी ठरणार, ‘या’ मुद्दावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार

नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

    नागपूर  शिंदे-फडणवीस सरकारचे नागपूरमधील हिवाळी अधिवेशन हे पहिले आहे, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, कालच्या दुसऱ्या दिवसानंतर आज देखील विरोधक आक्रमक होत, सत्ताधाऱ्यांना घेरणार आहेत. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. नागपूर न्यास जमीन विक्रीच्या प्रकरणाच्या मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक आज विधीमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) तिसऱ्या दिवशीही आक्रमक होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अकरा मोर्चे निघणार असून त्यामध्ये लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे. तर मुस्लिम आरक्षण व इतर मागण्यांसाठी एमआयएम पक्षाकडूनही मोर्चा काढला जाणार आहे. तसेच विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी एनआयटी जमीन विक्री प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर सुरू असलेली दडपशाही आदी मुद्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी केली. तर, दुसरीकडे विरोधी पक्षांच्याविरोधात शिंदे गटाचे आणि भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.

    काल विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती. संतांबाबत केलेले कथित वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी माफी मागण्याची मागणी भाजप आमदारांनी केली. तर, शिंदे गटाच्या आमदारांनी ‘पन्नास खोके, एकदम ओके’ या घोषणेला प्रत्युत्तर दिले. आज तिसऱ्या दिवशीदेखील विरोधक सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारी असणार आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतवून लावण्यास सत्ताधाऱ्यांकडून रणनीति ठरवण्यात आली आहे.