पुण्यात भरदिवसा कॅम्पात भरधाव कारचा ‘थरार’; दुचाकी वाहनांना उडविले; एक जखमी

  पुणे : कॅम्प परिसरात भरदिवसा भरधाव कारने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना उडविले. या थरारात एका तरुणाच्या पायावरून कार गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. जाफरिन लेनमधील थाऊजंड चौकात हा प्रकार दुपारी तीनच्या सुमारास घडला. दरम्यान, कारचालक तरुणाला फिट आल्याने कारवरील नियत्रंण सुटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

  लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात कार चालक रविंद्र धनवडे (वय ३२, रा. शिर्डी, जि. अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत मोहम्मद अनिस शौकतअली खत्री (वय २९ रा. मध्यप्रदेश) हा तरुण गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

  कारचालक तरुण रविंद्र याला फिटचा आजार

  पोलिसांच्या माहितीनुसार, कारचालक तरुण रविंद्र याला फिटचा आजार आहे. तशी माहिती या तरुणाने पोलिसांना दिली आहे. तत्पूर्वी तो कारवर चालक म्हणून काम करतो. दुपारी तीनच्या सुमारास तरुण कॅम्पातील जाफरिन लेन येथून जात होता. तेव्हा थाउजंड चौकात अचानक त्याला फीट आली आणि त्याचे कारवरील नियत्रंण सुटले.

  नियत्रंण सुटल्यानंतर या भरधाव कारने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केलेल्या १० ते १२ वाहनांना धडक दिली. त्यानंतर ही कार या गाड्यांनाच धडकून थांबली. त्यात मोहम्मदला देखील कारने उडविले. तसेच, तो खाली पडल्यानंतर कारचे चाक त्याच्या पायावरून गेले. यात तो जखमी झाला.

   

  दरम्यान, घटनेमुळे परिसरात एकच थरार उडाला होता. नागरिकांची एकच धावपळ उडाली. कार गाड्यांना अडकून पडल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रविंद्र याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.