मांजरीतील व्यापाराच्या अपहरणाचा थरार; कारमधून अपहरण अन् विरारमध्ये सुटका..!

पुण्यातील मांजरीत दोन दुकानांचा मालक असणाऱ्या व्यापाऱ्याचे रात्री अपहरण नाट्य घडले. अपहरण नाट्याचा थरार घडला असला तरी मध्यरात्री या व्यापाऱ्याची अपहरणकर्त्यांनीच विरारमध्ये सुखरूप सुटका केली अन् भांड्यात जिव अडकलेल्या पोलीस व नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.आधी अपहरण अन् नंतर सुखरूप सुटका झाली असली तरी या अपहरणनाट्याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नसून, पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    पुणे : पुण्यातील मांजरीत दोन दुकानांचा मालक असणाऱ्या व्यापाऱ्याचे रात्री अपहरण नाट्य घडले. अपहरण नाट्याचा थरार घडला असला तरी मध्यरात्री या व्यापाऱ्याची अपहरणकर्त्यांनीच विरारमध्ये सुखरूप सुटका केली अन् भांड्यात जिव अडकलेल्या पोलीस व नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला.आधी अपहरण अन् नंतर सुखरूप सुटका झाली असली तरी या अपहरणनाट्याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नसून, पोलिसांकडून त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

    या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अनोळखी अपहरण कर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २८ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मित्रानेच त्यांच्या दुकानाशेजारी राजस्थानतील एका व्यापाऱ्याने स्टेशनरी व मॅचिंग सेंटरचे दुकान टाकलेले आहे. चार महिन्यांपुर्वीच संबंधित व्यक्तीने हे दुकान सुरू केलेले आहे. पुण्यात देखील ते चार ते पाच महिन्यांपुर्वी आलेले आहेत.

    दरम्यान, रात्री आकराच्या सुमारास तीघेजन त्यांच्या दुकानात खरेदीच्या निमित्ताने आले. त्यानंतर काही वेळानेच एक कार दुकानासमोर आली व या व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. त्यांना उचलून कारमध्ये बसविले गेले. त्यांनी बचाव-बचाव म्हणून आरडा ओरडा केल्यानंतर तक्रारदार यांचे लक्ष या घटनेकडे गेले आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

    घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या व्यापाऱ्याचा शोध सुरू केला. पण, त्यांचा थांगपत्ता काही लागला नाही. वेगवेगळी पथके परिसरात व वेगवेगळ्या दिशेने शोध घेत होती. सीसीटीव्हीची पडताळणी सुरू केली. मोबाईल अन् इतर माहिती तिथेच असल्याने अपहरणाचे कारणही पोलिसांना शोधता येत नव्हते. तर, चौकशीला नातेवाईकही काही माहिती देत नसल्याने तसेच चारच महिन्यापुर्वी पुण्यात दाखल झालेल्या या व्यापाऱ्याचे कोणाशी भांडण किंवा वादही समजेनाशे झाले होते.

    मात्र, पोलिसांकडून कसून शोध व धावपळ सुरू असतानाच मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास या व्यापाऱ्याचाच फोन आला अन् मला सुखरूप विरारमध्ये सोडले असल्याची माहिती दिली. हा व्यापारी ट्रॅव्हल्सने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुण्यात पोहचला. यानंतर पोलीस यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला. आता या व्यापाऱ्याकडे पोलिसांकडून माहिती घेतली जात असून, अद्यापही अपहरण नेमकं का झाले हे समजू शकलेले नाही. चार महिन्यांपुर्वी या व्यापाऱ्याचा घटस्फोट झाला आहे. त्यानंतर तो पुण्यात आला होता, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीने तपास केला जात आहे.