“दिल्लीपासून महाराष्ट्रपर्यंत फसवणुकीचा व्यापार जोरात सुरु आहे…”, कसली गुढी व कसली तोरणे? सामनातून राज्य व केंद्र सरकारवर टिका

आज त्या वचनास 10 वर्षे होत आली तरी विदर्भ आणि यवतमाळला असा कोणताच उद्योग आलेला नाही. उलट शेतकरी जास्तच आत्महत्या करू लागलाय.” शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू असे सांगून फसवणाऱ्या सरकारचे हे धंदे. असं आज सामनातून मोदींवर टिका करण्यात आली आहे.

मुंबई- मराठी नववर्ष आले आणि गेले. अवकाळी पाऊस, गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रात नवीन वर्ष साजरे झालेच नाही. मंगळवारी मी दिल्लीत होतो. दिल्लीतही मुसळधार पाऊस सुरू होता. संसदेत पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्रातील शिंदे गटाचे खासदार हातात लहान गुढी घेऊन पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी उभे होते. महाराष्ट्रावरील स्वाभिमानाची गुढी-तोरणे ज्यांनी उचकटून टाकली त्यांच्या दारात महाराष्ट्राचे खासदार स्वाभिमान गुंडाळून उभे राहिलेले त्या दिवशी पाहिले. दोन गोष्टी त्या दिवशी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातील विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी कांदा, द्राक्षाच्या टोपल्या घेऊन ठाण मांडले होते. उद्ध्वस्त शेतकऱ्यांची वेदना त्यांना मांडायची होती, पण ऐकणारे सरकार आज दिल्ली आणि महाराष्ट्रात नाही. अशी टिका आज सामना वृत्तपत्रातून राज्य व केंद्र सरकारवर करण्यात आली आहेे.

दुसरी बातमी त्याच दिवशी प्रसिद्ध झाली. पंतप्रधानांच्या दारात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी घेऊन ताटकळणाऱ्यांनी ती बहुधा वाचली नसावी. टेक्स्टाईल कमिशनरचे मुख्यालय, जे 1943 पासून मुंबईत होते, ते मुंबईतून हलविण्याचे फर्मान दिल्लीने काढले. हा महाराष्ट्राला डिवचण्याचा आणखी एक प्रकार. वस्त्र आयुक्तालय मुंबईतून का हलवताय? असे पंतप्रधानांना विचारण्याची हिंमत खासदारांनी दाखवली नाही, पंतप्रधान मोदी जे बोलतात ते करत नाहीत. सत्ता आणि निवडणुका जिंकण्यासाठी ते व त्यांचे लोक खोटे बोलतात. विदर्भातील एक शेतकरी दिल्लीत भेटले. त्यांनी सांगितले, “विदर्भातील शेतकऱ्यांत आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यात हा आता अवकाळी पाऊस. काय करायचे? कसे जगायचे?”

“मोदींचे विदर्भावर विशेष प्रेम आहे. ते मदत करतील?” मी. यावर तो शेतकरी म्हणाला, “साहेब, पंतप्रधान फक्त थापा मारून जातात. 20 मार्च 2014 या दिवशी यवतमाळ जिल्हय़ातील दाभडी या गावात श्रीमान मोदी साहेबांनी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम जोरात केला होता. यामध्ये कापूस उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्याचे वचन त्यांनी दिले होते. आज त्या वचनास 10 वर्षे होत आली तरी विदर्भ आणि यवतमाळला असा कोणताच उद्योग आलेला नाही. उलट शेतकरी जास्तच आत्महत्या करू लागलाय.” शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करू असे सांगून फसवणाऱ्या सरकारचे हे धंदे. असं आज सामनातून मोदींवर टिका करण्यात आली आहे.