सांगलीत संपन्न झाला झाडाचा वाढदिवस ; पर्यावरण प्रबोधिनीचा अनोखा उपक्रम

झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील पर्यावरण प्रबोधिनीच्या वतीने चक्क झाडाचा वाढदिवस साजरा करून पर्यावरणाच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा आणि समृद्धीकरणाचा एक अनोखा संदेश दिला आहे.

    सांगली : झाडांबद्दल कृतज्ञता (The tree’s birthday)व्यक्त करण्यासाठी येथील पर्यावरण प्रबोधिनीच्या वतीने चक्क झाडाचा वाढदिवस साजरा करून पर्यावरणाच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा आणि समृद्धीकरणाचा एक अनोखा संदेश दिला आहे.
    सामाजिक बांधिलकीच्या,जबाबदारीच्या आणि कर्तव्याच्या भावनेतून व्यापक सामाजिक परिवर्तनासाठी नियमितपणे कार्यरत असणाऱ्या येथील सत्यशोधक प्रबोधिनी परिवारातील पर्यावरण प्रबोधिनीच्या  ‘क्रांतीस्मृती वृक्ष लागवड व संवर्धन मोहीमे’ अंतर्गत  ‘टीम पर्यावरण मैत्र’ च्या पुढाकारातून,प्रयत्नातून आणि परिश्रमातून प्रबोधिनी रोपीत व संवर्धित ‘प्रेरणा वृक्षा’चा पाचवा वाढदिवस मोठ्या उत्साहात व अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रेरणा वृक्षाच्या वाढदिवसानिमित्त आमदार अरुण लाड,ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव , ज्येष्ठ समाजवादी नेते व्ही.वाय. पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सातारा प्रतिसरकारमधील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माधवराव माने यांच्या हस्ते क्रांतीस्मृती वृक्षारोपण करण्यात आले.
    याप्रसंगी टीम पर्यावरण मैत्रचे स्वप्निल पाटील, गणेश उबाळे, नसीम गवंडी, सुरज बरगाले, सना पटेल, वरद नागठाणे, अजल माळी, सौरभ कुलकर्णी, विशाल शेंडे, सिद्धार्थ माळी, अभिषेक साळुंखे, अनिल माने, रघुनाथ नार्वेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.