तळपत्या उन्हात आदिवासी नागरिकांची घोटभर पाण्यासाठी पायपीट; शाळा सोडून विद्यार्थी भरतायेत पाणी

इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. यामुळे खरंच हा का धरणांचा तालुका असा प्रश्न निर्माण होतो.

    इगतपुरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यामध्ये पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत आहे. इगतपुरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून नावाजला जातो. इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते. मात्र याच इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. यामुळे खरंच हा का धरणांचा तालुका असा प्रश्न निर्माण होतो.

    इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. मात्र या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सकाळपासून या भागातील महिला, पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. हसण्या खेळण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात येथील लहान मुलांना डोंगर दऱ्या, जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी जावे लागत आहेत. या भागामध्ये श्वापदांची देखील भीती आहे. त्यामुळे जीव मुठीत घेऊन हे आदिवासी बांधव पाण्यासाठी वणवण फिरत आहेत.

    उन्हाच्या झळा आत्ताच बसू लागल्या आहेत. त्यामध्येच वाढती पाणीटंचाई सर्वांची डोकेदुखी वाढवत आहे. खडकवाडीतील बांधव पाण्यासाठी जीवावर उदार होऊन सहा ते सात किलोमीटर रणरणत्या उन्हातून चालत जात आहेत. एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जे पाणी जनावरेही पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाण्यातून या बांधवांना तहान भागविण्याची वेळ आली आहे. केंद्र शासनाची ‘हर घर नल हर घर जल’ या योजना या दुर्गम भागांपर्यंत अद्याप पोहचलेली देखील नाही. यावरुन महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, “निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधीं ना कधी दिसणार,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “शिक्षण घेण्याचा वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागतेय यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे सांगायला नको.पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येतेय. जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्या शिवाय शांत बसणार नाही” असा आक्रमक पवित्रा लकी जाधव यांनी घेतला आहे.