राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पडला लांबणीवर; विधानसभा अध्यक्षांना 15 फेब्रुवारीची मुदत

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.

    नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

    नार्वेकरांनी याबाबत वेळ वाढवून मागितली होती. मात्र, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना द्या, अशी मागणी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

    या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. न्यायालयाने त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिल्यामुळे 31 जानेवारी रोजी अपेक्षित असलेला निकाल आता लांबला आहे.

    दोन आठवड्यांची मुदत

    नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तीन आठड्यांचा वेळ मागितला होता. पण, वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी याला विरोध केला. वेळ वाढवून मागणे, हे नेहमीच होत आहे, त्यामुळे एकच आठवड्याची मुदत द्यावी, असे सिंघवी म्हणाले, यावर न्यायालयाने नार्वेकर यांना तीनऐवजी दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली. याचिकेवर सुनावणी घेताना तुषार मेहता यांनी मुदतवाढीची मागणी केली.

    आज, उद्या अंतिम सुनावणी

    राष्ट्रवादीच्या याचिकेसंदर्भात सोमवारची सुनावणी पूर्ण झाली असून, आम्ही दोन्ही बाजूचा एव्हिडेन्स क्लोज केलेला आहे. मंगळवार आणि बुधवारी यावर अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला हे प्रकरण क्लोज होईल, असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले. सोमवारी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची आज फेरसाक्ष नोंदविण्यात आली.