कुरकुंभ एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस येथे फुटली; लाखो लिटर पाणी वाया

कुरकुंभ औद्योगिक (एमआयडीसी) वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस कारखाना रोडवर अहिल्याबाई होळकर चौक परिसरात अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी तर वाया गेलंच पण रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं.

    पाटस : कुरकुंभ औद्योगिक (एमआयडीसी) वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस कारखाना रोडवर अहिल्याबाई होळकर चौक परिसरात अचानक फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी तर वाया गेलंच पण रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी साचलं होतं. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

    पाटस येथील कारखाना रोड अर्थात अष्टविनायक रस्त्यावर राजमाता अहिल्याबाई होळकर चौक परिसरात वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सांयकाळी सातच्या सुमारास फुटली‌. लोकांच्या गर्दीने गजबजलेला चौकात अचानक ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे फवारचे फवारे हवेत लांबची लांब उडाले. मोठा पाऊस आल्याचा भास या चौकात आजूबाजूला असलेल्या अनेकांना झाला. मात्र, पाण्याच्या फवारे हवेत उंच भरारी घेत असलेले, काही क्षणात या ठिकाणी पाणीच पाणी साचले. या ठिकाणी काही व्यापाऱ्यांच्या दुकान परिसरात पाणी शिरले तर रस्त्यावर जणू काही पाण्याचं तळच साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले.

    मागील काही महिन्यांपासून वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातील पाणी साठा संपुष्टात आल्याने हा तलाव कोरडा पडला होता. काही दिवसापूर्वी वरवंड ग्रामपंचायत प्रशासनाने खडकवासला कालव्याचे दरवाजे तोडून व्हिक्टोरिया तलावात पाणी सोडले होते. आठ दहा दिवसांपूर्वी हा तलाव पाण्याने भरला आहे. त्यामुळे या तलावातुन कुरकुभ एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरू केला आहे.