कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्याच अंगावर महिलेने ओतले उकळते पाणी; पोलिस दलात खळबळ

कारवाईसाठी गेलेल्या जळगाव जामोद पोलिसांच्या अंगावर एका महिलेने उकळते गरम पाणी टाकल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    जळगाव जामोद : कारवाईसाठी गेलेल्या जळगाव जामोद पोलिसांच्या अंगावर एका महिलेने उकळते गरम पाणी टाकल्याची घटना तालुक्यातील खांडवी येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले असून, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.

    जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील रहिवासी अनंता जानकीराम सारोकार याच्या दुकानांमध्ये लताबाई सारोकार या बेकादेशीरपणे प्रवेश करून त्यांच्या दुकानाला आतून लॉक लावून बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता. याप्रकरणी अनंता सार्वकाऱ्यांनी जळगाव जामोद पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.

    तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक इंगळे हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह खांडवी येथे सदर दुकानावर कारवाईकरिता गेले असता लताबाई सारोकर यांनी दुकान उघडण्यास मनाई केली. यावेळी पोलिसांनी सदर दुकानाचा शटरचा लॉक वेल्डिंग कटरच्या सहाय्याने कापून दुकानाचे शटर उघडले असता लताबाई सारोकार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गरम उकळते पाणी टाकले.