वरवंड ग्रामदैवताची यात्रा उद्यापासून सुरू, यात्रेच्या तयारीला वेग

वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव रविवार (दि.२६) पासून सुरू होत आहे. हा यात्रा उत्सव दोन दिवस सुरू राहणार असून, त्या दृष्टीने यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर श्री गोपीनाथ मंदिर परिसर तसेच गावातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.

    वरवंड : वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव रविवार (दि.२६) पासून सुरू होत आहे. हा यात्रा उत्सव दोन दिवस सुरू राहणार असून, त्या दृष्टीने यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर श्री गोपीनाथ मंदिर परिसर तसेच गावातील प्रमुख धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. तसेच गावात उंच व इतर पाळणे उभारले आहेत.

    या यात्रेसाठी पाहुण्यांना आमंत्रण देण्यासाठी ग्रामस्थ व्यस्त झाले आहेत. दरम्यान दिनांक २६ रोजी पहाटे श्रींचा महाभिषेक, भाविकांचे नवसाचे धज बांधणे, तसेच भाविक पाहुणे, ग्रामस्थ यांचे दंडवत, या धार्मिक कार्यक्रमाने यात्रेची सुरवात होते. तसेच रात्री ८ वाजता पारंपरिक ढोल- ताशांच्या गजरात श्रींची छबिना आणि पालखी मिरवणूक व पाटलांचे मानाचे लोटांगण होते. यावेळी बाराबलुतेदारांना तसेच यात्रा उत्सवात काम करणारे सर्व कारागीर यांना बिदागी वाटप करण्यात येते.

    रविवार (दि. २६) रोजी रात्री श्री गोपीनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ आणि पै- पाहुण्यांच्या करमणुकीसाठी पांडुरंग मुळे यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार (दि.२७) रोजी सकाळी ९ वाजता जि. प. प्राथमिक शाळा येथे तमाशा मंडळाच्या हजेरीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती आखाडा आणि रात्री ७ वाजेपर्यंत व जि. प. प्राथमिक शाळा प्रांगणात रघुवीर खेडकर कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहेत.