मध्यरात्री आकुर्ली येथील दुकानात चोरी

चोरांनी त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळवले आहे. रात्री दोनच्या सुमारास आकुर्ली येथील आईजी ट्रेडिंग होलसेल दुकानात त्यांनी शटर उचकटण्याचा प्रयत्न केला.

    पनवेल, ग्रामीण : आकुर्ली येथील किराणा दुकानाच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी गल्ल्यातील वीस ते पंचवीस हजार रुपये चोरून नेल्याची घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

    पनवेल तालुक्यातील गावांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलेले आहे. चोरांनी त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे वळवले आहे. रात्री दोनच्या सुमारास आकुर्ली येथील आईजी ट्रेडिंग होलसेल दुकानात त्यांनी शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर उचकटले नाही. त्यामुळे त्यांनी पाठीमागच्या बाजूने जाऊन सिमेंटच्या भिंतीला कशाच्या तरी सहाय्याने भगदाड पाडून त्या वाटे दोघांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानाच्या गल्ल्यातील अंदाजे 20 ते 25 हजार रुपये चोरून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

    दोन्ही चोरांनी तोंडाला कपडा बांधलेला आहे. सकाळी दुकानदाराने दुकान उघडले असता त्याच्या हा प्रकार लक्षात आला. या चोरीची माहिती खांदेश्वर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील तपास सुरू केला आहे. चोऱ्या होत असल्याने पोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.