बारामती तालुक्यातील मरीमाता मंदिरात चोरी; साडेतेरा लाखांचा ऐवज लंपास

बारामती तालुक्यातील मोढवे येथील मरीमाता देवस्थान मंदिरात दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. या सर्वांनी मंदिरातील सुमारे १३ लाख ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

    बारामती : बारामती तालुक्यातील मोढवे येथील मरीमाता देवस्थान मंदिरात दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला. या सर्वांनी मंदिरातील सुमारे १३ लाख ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. मंगळवारी (दि २१) दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन ही चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या चोरीमुळे परीसरात खळबळ उडाली आहे.

    बारामती तालुक्यातील मोढवे येथील मरीमाता देवी ही सर्वत्र प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र मोरगाव पासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. या देवस्थानचे व्यवस्थापक सिताराम भाऊ जाधव यांनी करंजे पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि.२१) रोजी मध्यरात्री दीड ते अडीचच्या दरम्यान मोढवे गावातील ग्रामदैवत मरीमाता मंदिरामधील ११ लाख ९० हजार रूपये किंमतीचे ग्रामदैवत मरीमाता मंदिरामधील चांदीचे मखरचे पार्ट अंदाजे १७ किलो वजनाचे, तसेच १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा चांदीचा टोप अंदाजे वजन २ किलो वजनाचे असा एकूण १३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ऐवजाची चोरी झाली आहे.

    तालुक्यातील मोढवे गावातील ग्रामदैवत मरीमाता मंदिरामधील अंदाजे १९ किलो वजनाचे चांदीची चोरी झाली असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहणीवरुन देवीचे मखरचे पार्ट व देवीचा चांदीचा टोप चोरणारे दोन अज्ञातांनी मंदिराचे दोन कुलपे तोडून मंदिरामधील हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

    चोरी करणाऱ्या दोन अनोळखी चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर करंजेपुल पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक निरीक्षक पोलिस सोनवलकर करत आहेत .