हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करुन चांदीचा डोळा चोरट्यांनी केला लंपास

अज्ञात समाजकंटक चोरट्यांनी धुळ्यातील हनुमान मंदिरात (Hanuman Temple Theft) असलेल्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून नेत मूर्तीची देखील विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    धुळे: शहरातील अनेक भागात चोरट्यांचा वावर वाढला आहे. चोरट्यांनी आता धुळ्यातील बंद घरानंतर मंदिरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बेलगाम झालेल्या चोरट्यांना पोलीस जेरबंद कधी करणार असा प्रश्न आता धुळेकर(Dhule Crime) नागरिक विचारत आहेत. धुळे (Dhule) शहरातील साक्री रोड भागात असलेल्या मोगलाई परिसरामधील महाले नगरात दक्षिण मुखी हनुमान मंदिरात काल चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटक चोरट्यांनी हनुमान मंदिरात (Hanuman Temple Theft) असलेल्या मूर्तीचा चांदीचा डोळा चोरून नेत मूर्तीची देखील विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन संबंधित समाजकंटक चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. हिंदू धर्माचे प्रेरणास्थान असलेल्या हनुमान मूर्तीची अशाप्रकारे विटंबना करून हिंदू बांधवांच्या भावनेला ठेच पोहोचवण्याचे कृत्य या अज्ञात चोरट्यांनी केले आहे. यापूर्वी देखील याच हनुमान मंदिरातील दानपेटी पेटवण्याचा देखील प्रयत्न झाला होता. मात्र या भागातील हिंदू बांधवांनी सामाजिक वातावरण बिघडू नये म्हणून सदर प्रकरण समजून शांत केले होते. मात्र पुन्हा पुन्हा असे प्रकार होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असे नागरिकांनी म्हटले आहे.

    हिंदू धर्मियांचे पवित्र उत्सव असलेले नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण तोंडावर असताना अशा पवित्र वातावरणात जर कोणी जाणूनबुजून हिंदू धर्मियांच्या भावनाला ठेच पोहोचवण्याचे काम करणार असेल तर आता आम्ही अशा विकृतींच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहोत. अशी प्रतिक्रियादेखील परिसरातील नागरिकांनी यावेळी दिली. आता धुळे शहरातील या चोरट्यांचा पोलीस प्रशासन कशाप्रकारे बंदोबस्त करते आणि धुळे शहरातील महाले नगरात झालेल्या हनुमान मंदिरात झालेला प्रकार किती गांभीर्याने घेते हे देखील येणाऱ्या काळात बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.