शरद पवारांच्या सभेत चोरी! जिल्ह्याध्यक्षांच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास

शरद पवार गटाच्या जिल्ह्याध्यक्षांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. तब्बल 6 तोळ्यांची सोन्याची साखळी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

    नाशिक : लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे जोरदार प्रचार सुरु असून राजकीय सभांचे सत्र वाढले आहे. आज दिंडोरी येथील वणी येथे जेष्ठ नेते शरद पवार यांची सभा पार पडली. मात्र या सभेमध्ये चोरीचा प्रकार घडला आहे. शरद पवार गटाच्या जिल्ह्याध्यक्षांच्या गळ्यातील सोन्याची साखळी अज्ञात व्यक्तीने लंपास केली. तब्बल 6 तोळ्यांची सोन्याची साखळी चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.

    महाविकास आघाडीकडून पाचव्या टप्प्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार गटातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. या सभेमध्ये जेष्ठ नेते शरद पवार देखील सहभागी झाले होते. तसेच सभेसाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहित पवार, अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. सभेसाठी दिंडोरीसह आसपासच्या परिसरातील सुरगाणा, कळवण, चांदवड, निफाड तालुक्यातून दहा हजारांवर नागरिक आले होते.

    शरद पवार यांच्या सभेला मोठी गर्दी जमली होती. त्यामध्येच शरद पवार गटाचे जिल्ह्याध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सोन्याची साखळी चोरली गेली. कोडांजी रावबा आव्हाड, वय 72 वर्षे (राष्ट्रवादी कॉग्रेज नाशिक जिल्हा अध्यक्ष) रा. प्लॉट नं. 57 पुष्कर बिल्डींग रामदास गार्डन समोर कॅनडा कॉर्नर नाशिक हे व्यासपिठावरुन उतरुन मैदानाबाहेर पडतांना असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोंडाजी आव्हाड यांच्या गळ्यातील गळ्यातील ६ तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. त्यामध्ये ओम पानचे पॅन्डल असे सुमारे तीन लाख रूपायांची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. याबाबत रात्री उशिरा वणी पोलिसांत कोंडाजी आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.