कासेगावमधील यल्लमा देवीच्या मंदिरात चोरी ; प्रभावळ, मुकुटाची चोरी, पंधरा लाखाचा ऐवज लांबविला

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पुरातन काळातील हेमल पत्ती यल्लमा देवीच्या मंदिरात काल रात्री ते पहाटेच्या दरम्यान यल्लमा देवीची चांदीची मूर्ती जुन्या मूर्तीला असलेले प्रभावळ, सिंहासन, सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचा मुकुट असा ऐवज चोरीला गेला आहे. त्याची अंदाजे किंमत सुमारे दहा ते पंधरा लाख आहे.

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे पुरातन काळातील हेमल पत्ती यल्लमा देवीच्या मंदिरात काल रात्री ते पहाटेच्या दरम्यान यल्लमा देवीची चांदीची मूर्ती जुन्या मूर्तीला असलेले प्रभावळ, सिंहासन, सोन्याचे पॉलिश असलेले चांदीचा मुकुट असा ऐवज चोरीला गेला आहे. त्याची अंदाजे किंमत सुमारे दहा ते पंधरा लाख आहे. या चोरीच्या घटनेने पंढरपूर तालुका पोलिसांना चोरांनी आव्हान दिले आहे.यल्लमा देवीच्या सहा पुजाऱ्यांची घरे मंदिराच्या मागील बाजूस आहेत. या सर्व घरांना चोरट्यांनी बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर मंदिराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे बाेलले जात आहे.

    या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जानेवारी महिन्यात यात्रा असते. नऊ जानेवारी रोजी असलेल्या यात्रेच्या पूर्वीच अशा प्रकारची घटना घडल्याने मंदिर परिसर व कासेगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवीच्या यात्रेसाठी देवीचे भक्त संपूर्ण महाराष्ट्रातून, परराज्यातूनही नवस फेडायला व यात्रेची वारी पोहोच करायला येत असतात. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, माजी उपसभापती प्रशांत देशमुख, सरपंच रिजवाना भालदार, उपसरपंच संग्रामसिंह देशमुख, नागरिक उपस्थित होते.

    ठसे तज्ज्ञ श्वान पथक पाचरण
    सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे यल्लमा देवीच्या चांदिच्या वस्तू, मुर्ती असा एवज चोरीला गेल्याने सर्वसामान्यातून भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पाहणी करून ठसे तज्ज्ञांना व श्वान पथकाला पाचरण केले. घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी जलद चक्रे फिरवली आहेत.