शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण होईना अन् शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय थांबेना; 11 महिन्यांत तब्बल 877 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या (Farmers Suicide) पाचवीलाच पुजलेला. संघर्ष करून तरी किती करायचा, असा प्रश्न 'आ' वासून उभा राहिल्याने हताश झालेले शेतकरी मरण जवळ करत असून, दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर जगाचा निरोप घेण्याची वेळ आणली आहे.

    छत्रपती संभाजीनगर : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या (Farmers Suicide) पाचवीलाच पुजलेला. संघर्ष करून तरी किती करायचा, असा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिल्याने हताश झालेले शेतकरी मरण जवळ करत असून, दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर जगाचा निरोप घेण्याची वेळ आणली आहे. मराठवाड्यात गेल्या ११ महिन्यात ८७७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत.

    जुलैमध्ये पाऊस झाला. त्याच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, जुलै महिन्यातच विभागात सर्वाधिक १०३ आत्महत्यांची नोंद आहे. ऑगस्टमध्ये ९९, सप्टेंबरमध्ये ९३ तर ऑक्टोबरमध्ये ९९ आत्महत्यांची नोंद आहे. गेल्या अकरा महिन्यांत १ जानेवारी पासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील तब्बल ८७७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. सरासरी दररोज तीन शेतकरी आपले जीवन संपवत आहेत.

    जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात मराठवाड्यातील ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर २०२१ या वर्षात ८८७ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. मागील वर्षी १ जानेवारी ते डिसेंबर २०२२ या काळातू मराठवाड्यात १२ शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती.