दिवाळीतही महागाईचा दणका; किराणा वस्तूंमध्ये झालीये भरमसाठ वाढ, नागरिकांचा मॉलकडेच वाढता कल…

दिवाळीचा सण सुरू झाला असून, घरोघरी सणाची लगबग सुरू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यावर्षीच्या फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याच्या खर्चात हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  अलिबाग : दिवाळीचा सण सुरू झाला असून, घरोघरी सणाची लगबग सुरू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे यावर्षीच्या फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याच्या खर्चात हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  सण कोणताही असो, उत्साह व आनंद आलाच. दिवाळीचाही सण आनंदाचा असल्याने विविध पदार्थ यानिमित्ताने तयार केले जातात. यावर्षी खाद्यतेलाचे दर जरी नियंत्रणात असले, तरी डाळी, साखर, रवा, मैदा, शेंगदाणे यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सण साजरा करताना होणारा खर्च भरून काढण्यासाठी अन्य खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते.

  सध्या नेहमीच्या किराणा विक्रेत्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत आहे. नोकरदार, मध्यमवर्गीय कुटुंब मात्र मॉलमधून खरेदी करत आहेत. मॉलमधील खरेदीवर असलेली ऑफर मिळविण्यासाठी गर्दी होत आहे.

  ग्राहकांचा खर्च नियंत्रणावर भर

  गतवर्षीच्या तुलनेत डाळी, साखर, रवा, मैदा, पोहे, शेंगदाणा दरात घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे सणासाठी पदार्थ तयार करण्यासाठी खर्चावर मर्यादा आली आहे. महागाईमुळे अधिकचा खर्च भागविण्यासाठी ग्राहकांना अन्य खर्चात काटकसर करावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीवर मर्यादा आली आहे.

  • स्वाती पाटील, गृहिणी

  महागाईमुळे सण साजरा करताना खरेदीवर मर्यादा आली आहे. एक / दोन किलो ऐवजी अर्धा पाऊण किलोची खरेदी ग्राहक करत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. खरेदीपूर्वी ग्राहक किमतीचा विचार करत आहेत. आरोग्याला प्राधान्य देत तेलकट, गोड, चमचमीत पदार्थाऐवजी कमी गोड, बेकरी पदार्थांना प्राधान्य दिले जात आहे. साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो. खर्च नियंत्रणावर विशेष भर आहे.