जतमध्ये वर्षभर टंचाईच्या झळा ; तालुक्यात परतीच्या पावसाची अपेक्षा फोल

कायम दुष्काळी जत तालुक्यातून अखेर मान्सून माघारी परतला आहे ४० टक्क्यांनी पाऊस कमी झाला. येत्या काळात पावसाचे कुठलेही चिन्ह नाहीत. अपेक्षित पाणीसाठा झाला नसल्याने वर्षभरात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत.

    जत : कायम दुष्काळी जत तालुक्यातून अखेर मान्सून माघारी परतला आहे ४० टक्क्यांनी पाऊस कमी झाला. येत्या काळात पावसाचे कुठलेही चिन्ह नाहीत. अपेक्षित पाणीसाठा झाला नसल्याने वर्षभरात टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. ५३ गावांना आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. २५ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

    तालुक्यात यदा उशिराने पावसाला सुरुवात झाली. अल निनोच्या प्रभावाने सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस पडला. उर्वरित तीन महिन्यांत देखील अपेक्षित आणि सर्वच भागात सारखा पाऊस झाला नाही. यावर्षी ३२९२ मिमी पाऊस झाला आहे.

    यंदा पाच वर्षांतील नीचांकी पाऊस झाला आहे. यंदा ४० टक्क्यांनी पाऊस कमी झाला आहे. मुसळधार व भीज पाऊस झाला नसल्याने जमिनीतील पाणीपातळी वाढली नाही. परिणामी, विहिरी व कूपनलिका कोरड्या आहेत. पाणी पातळी ५०० ते ६०० फुटापर्यंत खाली गेली आहे. २८ तलावांपैकी १० तलाव कोरडे, १२ तलावांतील पाणी साठा मृत संचयाखाली आहे. सध्या फक्त 3 टक्के पाणीसाठा आहे. २५ गावांना २९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे ४६ टक्के पेरण्या गेल्या पण पावसाअभावी हाती काही आले नाही. पाऊसच नसल्याने रब्बी हंगामही वाया जात आहे. परतीचा पाऊस तरी थोडाफार हजेरी लावून जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे.

    कृती टंचाई आराखडा हवा
    सर्वेक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडून गावागावातील पर्जन्यस्थिती, भूगर्भातील पाणीपातळी व इतर अनुषंगिक बाबींचा अभ्यास करून नवीन कृती टंचाई आराखडा तयार करावा लागणार आहे.

    १ जून ते सप्टेंबरपर्यंतचा पाऊस
    २०२२- ४७९.७ मिमी
    २०२३- ३२९.२ मिमी