मंत्रिमंडळाचा विस्तारापेक्षा डच्चू कोणाला मिळणार याचीच सर्वाधिक चर्चा, भाजपच्या गोटात भीतीचे वातावरण

    मुंबई : आज मंत्रीमंडळाच्या विस्ताराचीच चर्चा जोरात सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत १९ जूनपूर्वी विस्तार होणारच असा नवा दावा आता केला जातोय. त्यामुळे साहजिकच इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू झाली. मात्र, आज इच्छुकांपेक्षा कुणाला वगळणार याची चर्चा सुरू झाल्याने भाजपाच्या मंत्र्यांमध्ये धास्ती वाढली आहे. भाजपाच्या किमान तीन विद्यमान मंत्र्यांना घरी बसविण्यात येणार असल्याची चर्चा मुंबईतील वर्तुळात सुरू झाली आहे.
    मंत्रीपद घेऊन सरकारची कामगिरी लोकांत पोचविण्यात कमी पडलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवू न शकणाऱ्यांना ‘नारळ‘ मिळू शकतो. त्यामुळे नव्या मंत्र्यांच्या नावाबरोबरच बाहेरचा रस्ता कुणाला दाखवणार याचीच चर्चा अधिक आहे. मंत्रीमंडळ विस्तारावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. त्यामुळे येत्या १५ दिवसात विस्तार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

    फायदेशीर ठरणाऱ्यांनाच मंत्रीपद
    नव्या विस्तारात लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विचार करून निर्णय घेण्यात येणार आहे. निवडणुकीत एक-एक जागा निवडून आणण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्यांनाच मंत्रीपद दिले जाईल. कुणाला वगळायचे याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत झाल्याचे समजते.

    मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासह वीसजण मंत्रीमंडळात
    सध्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यासह वीसजण मंत्रीमंडळात आहेत. यातील कुणाचे मंत्रीपद जाणार याचा अंदाज इतर कुणाला नसला तरी शाह-शिंदे व फडणवीस यांना नक्की आहे. या चर्चेमुळे भाजपाच्या मंत्र्यांची धाकधूक मात्र वाढली आहे. येत्या काळात लोकसभेबरोबरच राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांदेखील भाजपासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत.