काम करण्यासाठी सहकारा एवढे ताकदवान क्षेत्र दुसरे कुठलेच नाही – भाजपा गटनेते प्रविण दरेकर

मी मुंबईत अभ्यूदय नगर येथे कार्यक्रम घेतला. त्यावेळी जवळपास १८ ते २० हजार लोकांना जमवले होते. ही ताकद एका राजकीय पक्षालाही जमणार नाही. हे सहकाराचे जाळे आहे. आज मी राजकारणात काम करत असलो तरी माझा आत्मविश्वास हा सहकाराने वाढवला आहे. सहकारात प्रचंड क्षमता असल्याचे दरेकर म्हणाले.

    मुंबई : भाजपा महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे संयोजक तसेच विधानपरिषद गटनेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी व टागोरनगर येथील कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन सहकारात काम करण्याची इच्छा व्यक्त करत जाहीर पक्ष प्रवेश केला. आपल्याला काम करण्यासाठी सहकारा एवढे ताकदवान क्षेत्र दुसरे कुठलेच नसल्याचे प्रतिपादन आ. प्रविण दरेकर यांनी यावेळी केले.

    याप्रसंगी सत्यवान करंगुटकर आणि त्यांचे सहकारी प्रणव हडकर, महेश केदारी, किशोर चाचे, सौ. प्रमिला हेडुलकर, सदाशिव शेडगे यांसह कार्यकर्त्यांनी सहकार आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी मुंबई जिल्हा बँकेचे संचालक नितीन बनकर, सुभाष दरेकर, सहकार आघाडीचे संतोष दरेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून जो विश्वास दाखवून तुम्ही काम करायचे ठरवले आहे. त्याबद्दल तुमचे स्वागत करतो. महाराष्ट्राची उभारणीच सहकाराच्या माध्यमातून झाली. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली ती सहकाराच्या जीवावर झाली. शहरातही सहकाराच्या माध्यमातून हौसिंग सोसायट्या, पतसंस्था, बँका, महिला सहकारी संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचे जाळे विणले गेले आहे. नवीन तरुण पिढीला सहकार समजून घ्यायचा नाही का? अशा एका वळणावर असताना आपण सर्वांनी चांगला विचार करत सहकारात प्रवेश केला आहे.

    आपल्याला काम करण्यासाठी सहकारा एवढे ताकदवान क्षेत्र दुसरे कुठलेच नाही. हे काम जिगरीचे, मेहनतीचे आहे. सहकारी संस्थांसाठी अनेक सवलती शासनाच्या आहेत. त्याचाही लाभ आपल्याला घेता येऊ शकतो. तसेच तुमच्या राहत्या ठिकाणी एखादी संस्था, महिला सहकारी संस्था स्थापन करा. त्या संस्थेमार्फत शंभर-दोनशे घरांत १०-१५ हजार रुपये गेले तर यासारखे दुसरे पुण्याचे काम नाही. आमदार १०-१५ हजाराचा रोजगार देऊ शकत नाही पण तुमची एक संस्था त्यांना १०-१५ हजाराचा रोजगार देऊ शकते ही ताकद सहकाराची आहे. तुम्हाला यासाठी प्रत्यक्षात जी मदत लागेल ती करायला मी तयार आहे, असे आश्वासनही दरेकरांनी दिले.

    दरेकर पुढे म्हणाले की, सहकारासारखे रोजगार देणारे दुसरे कुठलेच माध्यम नाही. ज्याच्यात धाडस नाही तो कधीच यशस्वी होत नाही. तुम्ही धाडसाने पाऊल टाकले तर तुमच्या मागे मी उभा आहे. सर्व ताकद देऊन जर नुसतेच सहकार आघाडीत येणार असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. सहकाराचा अर्थ एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हा आहे. आज सरकारही त्याच धर्तीवर चालले आहे. सहकार व्यापक आहे त्यासाठी सगळ्यांनी काम करावे, असे आवाहनही दरेकरांनी केले. तसेच यावेळी दरेकरांनी मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी कामगार, माथाडी कामगारांसह सर्वसामान्य घटकांना घरांसाठी मुंबई बँकेमार्फत आर्थिक मदत केल्याचेही विस्तृतपणे विषद केले.