मंत्री आल्याशिवाय माघार नाही; धनगर आरक्षण आंदोलक चंद्रकात वाघमोडे यांची भूमिका

शासनाने धनगर आरक्षण प्रकरणी गठीत केलेली समिती हा वेळकाढूपणा असल्याचा आरोप गेली १२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी केला असून, जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चार ओळीचे पत्र घेऊन येत नाही, तोपर्यंत आपण प्राण गेले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊन आमरण उपोषण मागे घेण्यास प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना नकार दिला.

  बारामती : शासनाने धनगर आरक्षण प्रकरणी गठीत केलेली समिती हा वेळकाढूपणा असल्याचा आरोप गेली १२ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी केला असून, जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील मंत्री चार ओळीचे पत्र घेऊन येत नाही, तोपर्यंत आपण प्राण गेले तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेऊन आमरण उपोषण मागे घेण्यास प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना नकार दिला.
  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी बारामती शहरातील प्रशासकीय भवन या शासकीय इमारतीसमोर चंद्रकांत वाघमोडे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेली बारा दिवसांपासून त्यांचे हे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी विविध भागातून धनगर समाज बांधव या ठिकाणी येत आहेत.
  मंत्र्यांनी चार ओळीचे पत्र द्यावे
  दरम्यान धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्र प्रांताधिकारी वैभव नावडकर हे आंदोलनस्थळी घेऊन आले होते, त्यांनी याबाबत राज्य शासनाची भूमिका सांगत आरक्षण अंमलबजावणी बाबत शासकीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पत्र वाघमोडे पाटील यांना दाखविले, त्यामुळे आपण आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती नावडकर यांनी केली.
  मात्र चंद्रकांत वाघमोडे यांनी समिती गठीत करण्याचा निर्णय म्हणजे शासनाचा वेळ काढू पणा असल्याचा आरोप करत, जोपर्यंत राज्य मंत्रिमंडळातील कोणताही एक मंत्री या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आपण आमरण उपोषण मागे घेणार नाही, सदर मंत्र्यांनी चार ओळीचे पत्र आपणास द्यावे, त्याचवेळी आपण उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय घेऊ मात्र सध्या प्राण गेले तरी आपण उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
  जबाबदार मंत्र्यांनी येऊन उपोषण सोडवावे
  बारा दिवस आपण अन्नाचा कणही घेतलेला नाही. धनगर समाजातील मुलांच्या भवितव्यासाठी आपण प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. ज्याचे उपमुख्यमंत्री दिवाळीमध्ये काटेवाडीत असून देखील ते या ठिकाणी आले नाहीत हे दुर्दैवी असल्याचे वाघमोडे यांनी यावेळी सांगितले. वाघमोडे यांची पत्नी व बहीण या ठिकाणी उपस्थित होती.
  माझा भाऊ बारा दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहे, त्याने अन्नाचा कणही घेतलेलं नाही, तरी देखील शासनाला त्याचे देणे घेणे नाही, मी घरी दिवाळीचा सण देखील केलेला नाही, त्याच्या जीवाला बरे वाईट झाल्यास, आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत मंत्रिमंडळातील जबाबदार मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन उपोषण सोडवावे, अशी मागणी यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याशी बोलताना केली. यावेळी दोघींनीही टाहो फोडत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बापूराव सोलनकर, नवनाथ पडळकर, कल्याणी वाघमोडे, विठ्ठलराव देवकाते, ॲड अमोल सातकर, ज्ञानदेव बुरुंगले आदींसह इतर समाज बांधव उपस्थित होते.