रामटेकच्या जागेवरून काँग्रेसमध्ये तिढा अद्याप कायम; निवडून येणारा उमेदवारच उतरवणार रिंगणात

केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत रामटेकच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसने राज्यातल्या 18 जागा लढवण्यावर निर्णय घेतला.

  नागपूर : केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत रामटेकच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दिल्ली येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत काँग्रेसने राज्यातल्या 18 जागा लढवण्यावर निर्णय घेतला आहे. तर राज्यातील केवळ सात जागांचा निर्णय झाला असून, उर्वरित जागांचा निर्णय अद्यापही होणे बाकी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली.

  काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. तर दुसरीकडे नागपूरमधल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून अनेक नावांची चढाओढ लागली असताना काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

  जागावाटपाबाबत काँग्रेस नेतृत्वाचा मोठा निर्णय

  रामटेक लोकसभा मतदारसंघात युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधून किशोर गजभिये, रश्मी बर्वे, राजू पारवे अशा अनेक नावांची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये वाढता गोंधळ पाहता काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे. ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, ज्या उमेदवाराचा सर्वे अहवाल सकारात्मक आहे, त्याच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा वतीने करण्यात येत आहे.

  नितीन राऊत यांच्या नावाचा विचार?

  रामटेकसाठी कुणाल राऊत आणि चंद्रपूरसाठी शिवानी वडेट्टीवार यांचा विचार करण्यापेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठीने लक्ष केले आहे. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातून कुणाल राऊत ऐवजी त्यांचे वडील नितीन राऊत यांना उमेदवारी मिळण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  विदर्भात काँग्रेसची डोकेदुखी

  संभाव्य उमेदवार रश्मी बर्वे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. जात वैधता प्रमाणपत्राबाबत काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वेंना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेसची आणखी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.