शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबाबत वळसे पाटील यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…

लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे व घड्याळ या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगच करेल, असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

    सातारा : लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे व घड्याळ या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगच करेल, असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

    सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. अजित पवार-शरद पवार यांच्या गटासमोर आपले उमेदवार उभे करण्याची भाषा करत आहेत, यावर घड्याळ चिन्हाचाही विषय चर्चिला जात आहे.

    लोकसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतात काय असे विचारले असता याची शक्यता फारच कमी असल्याचे वळसे पाटील म्हणाले. घड्याळ चिन्ह कोणाला जाणार असा प्रश्न वळसे पाटील यांना विचारला असता त्याचे उत्तर निवडणूक आयोगच देईल असेही त्यांनी सांगितले.

    मला त्याबाबत काहीही माहीत नाही

    अजितदादांना अध्यक्ष करण्यासाठी खासदार शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र त्यावेळी अजित पवार अध्यक्षपद नको म्हणाले होते, असे जयंत पाटील बोलल्याचे निदर्शनास आणले असता वळसे-पाटील म्हणाले, माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत काहीही माहीत नाही, असं सांगत याविषयी अधिक बोलणे टाळले.