पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांसमोर ‘चुप्पी’; औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो नसल्याचे बावनकुळे नाराज

उष्माघात प्रथमोपचार औषधी संचावर पंतप्रधानांचे छायाचित्र नसल्याने बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

    पुणे : बारामती व शिरुर सोबतच पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक देखील रंगली आहे. भाजपचे माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर येण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत आहेत. यावेळी देखील भाजपसमोर रवींद्र धंगेकर यांचे आव्हान उभे आहे. त्यामुळे भाजप शर्तीचे प्रयत्न करत आहेत. आज पुण्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचाराचा आढावा घेतला. वेळी मतदारसंघात वाटायच्या उष्माघात प्रथमोपचार औषधी संचावर पंतप्रधानांचे छायाचित्र नस

    ल्याने बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

    नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी संपूर्ण भाजपने देशभरामध्ये जय्यत तयारी सुरु केली आहे. यंदा 400 पार करण्याचा नारा देत त्यासाठी अथक प्रचारकार्य केले जात आहे. मात्र पुण्यातील प्रचारामध्ये पंतप्रधानांचा चेहरा नसल्याचे समोर आले आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवार मुरलीधर मोहोळ, नेते व पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कसबा विधानसभा मतदारसंघातील अप्पा बळवंत चौकात आले होते. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेथील दुकानदार आणि कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पत्रके वाटली.

    यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपले एक मत देण्याचे आवाहन केले. सध्या उन्ह लक्षात घेऊन कसबा विधानसभा मतदारसंघातील घरोघरी जाऊन उष्माघात प्रथमोपचार औषधी संच देण्याचे नियोजन केले आहे. हे औषधी संच बावनकुळे यांना दाखविण्यात आले. त्यावर केवळ मुरलीधर मोहोळ यांचा फोटो आणि संकल्पना नामदार चंद्रकांत दादा पाटील असे लिहिले होते. हे पाहिल्यावर चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित पदाधिकारी हेमंत रासने, राजेश पांडे यांना म्हणाले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही. आपण घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मत मागत आहोत, तर यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो का नाही टाकला, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करीत जाब विचारला. त्यावर या दोन्ही स्थानिक नेत्यांकडे काहीच उत्तर नव्हते.