‘काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप होणार’, भाजप खासदाराचा दावा, म्हणाले…

महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण जसजशा घडामोडी घडत गेल्या तेव्हा काँग्रेसमधून एकाही आमदाराने बंडखोरी केलं नसल्याचं स्पष्ट झालं.

    अहमदनगर- “काँग्रेसचे (Congress) ठराविकच लोक मलिदा खात होते. जशी शिवसेनेच्या आमदारांमध्ये धुसफूस होती तशी काँग्रेसच्या आमदारांमध्येही अस्वस्थता आहे. त्यांचे स्वतःचे मंत्री देखील आमदारांचे काम करत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहा, ही तर सुरुवात आहे. भविष्य काळात काँग्रेस पक्षामध्ये मोठा राजकीय भूकंप येईल. महाराष्ट्राची जनता ते पाहिल”, असं सूचक विधान सुजय विखे पाटील यांनी केलं.

    प्रदेशाध्यक्ष बदला – माजी आमदार आशिष देशमुख
    काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी केल्याची माहिती नुकतीच समोर आलीय. विशेष म्हणजे आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांनी दिल्लीत जावून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेत आपली उद्विग्नता व्यक्त केलीय. या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. याशिवाय काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीबद्दल अनेकदा चर्चा होतात. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण जसजशा घडामोडी घडत गेल्या तेव्हा काँग्रेसमधून एकाही आमदाराने बंडखोरी केलं नसल्याचं स्पष्ट झालं. पण तरीही वारंवार काँग्रेसबद्दल अशा अनपेक्षित चर्चा वारंवार समोर येतात.