Solapur ZP
Solapur ZP

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने निवृत्त शिक्षकांना घेण्याचा अध्यादेश काढला असला तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने निवृत्त शिक्षकांना घेण्याचा अध्यादेश काढला असला तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला पूर्णवेळ शिक्षण अधिकारी नसल्याने चालू शैक्षणिक वर्षातील संच मान्यताच न झाल्याने जिल्ह्यातील अनेक शिक्षक आता अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागासाठी स्वतंत्र शिक्षण अधिकारीच नाही. प्रभारी शिक्षण अधिकाऱ्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून कामकाज चालले आहे. विद्यार्थ्यांचे आधार लिंकिंगचे काम अपूर्ण आहे. यामुळे आता शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. बरेच विद्यार्थी शाळेत हजर असूनही त्यांचे आधार अपडेट न झाल्यामुळे शिक्षकांना अतिरिक्त होण्याची पाळी आली आहे. या गंभीर समस्येकडे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने लक्षच दिलेले नाही. त्यामुळे एकीकडे शिक्षक नाहीत म्हणून निवृत्त शिक्षक भरती करण्याची पाळी आली आहे तर दुसरीकडे संच मान्यताच न झाल्याने आहे तेच शिक्षक आता अतिरिक्त होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासन प्रमुख महिला सक्षमीकरणात व्यस्त आहेत तर प्रभारी शिक्षण अधिकाऱ्यांना कोणते काम प्राधान्याने करावे हेच समजत नसल्यामुळे गोंधळ उडाला आहे. शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या “खेळ खंडोबा’ कडे अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे. दोन्ही विभागाला पूर्णवेळ शिक्षण अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी कारभार चालविला जात आहे. यामध्ये शिक्षण विभागाचा कारभार कसा करायचा कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे याचा प्राधान्यक्रम न ठरल्याने मोठा गोंधळ उडत असल्याचे गंभीर चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.

    संच मान्यताच नाहीत…

    चालू शैक्षणिक वर्ष, मागील शैक्षणिक वर्षाचा ताळमेळ घेऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर शिक्षकांची संच मान्यता आत्तापर्यंत होणे अपेक्षित होते. पण अद्याप बराच शाळांमध्ये हे काम झाले नाही. त्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे.