पाच पोलीस ठण्यांची होणार वाढ, नवी मुंबई पोलीसांच्या कारभारात येणार सुटसुटीतपणा

नवी मुंबईचा वाढता भौगोलिक विस्तार तसेच वाढती लोकसंख्या पाहता पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यासोबत नवी मुंबईत सिडकोमर्फत तब्बल ९५ हजार घरांची निर्मिती करण्यात येत आहे.

  नवी मुंबई | सावन वैश्य : मुंबईला पर्यायी शहर म्हणून निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबई परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याशिवाय मोठमोठे उद्योग, व्यवसाय, गृहनिर्माण प्रकल्प तसेच विमानतळ देखील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात होत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द दिघा ते पनवेल, उरण पर्यंत पसरलेली आहे. मात्र आता वाढत्या लोकसंख्या पाहता यात नवीन ५ पोलीस ठाणे आणि २ सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व आणखी एका परिमंडळाची नवीन निर्मिती केली जाणार आहे.

  सद्य: स्थितीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत २ परिमंडळ येतात. त्यात नवी मुंबई शहरात परिमंडळ १ तर पनवेल व उरण शहरासाठी परिमंडळ २ अशी विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक परिमंडळात १० पोलीस ठाणी ४ सहाय्यक आयुक्त कार्यालय येतात. सध्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत २० पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.‌ त्यात भर पडणार असल्याने, नवीन ५ पोलीस ठाण्यांमुळे आणखी २ सहाय्यक आयुक्त देखील नवी मुंबईला मिळणार आहेत. नवी मुंबई शहरात येणारे मोठमोठे प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्हावा शिवडी लिंक रोड, विरार अलिबाग कॉरिडोअर, तसेच उलवे नोड, द्रोणागिरी यांसारखा मोठा विकसित होणारा भाग पाहता नवी मुंबईत आणखी एक अतिरिक्त परिमंडळ निर्माण केले जाणार आहे. दोन्ही परिमंडळाच्या मध्यभागी असलेली एनआरआय पोलीस ठाणे, नेरूळ, सीबीडी, सानपाडा, उरण- मोरा, न्हावाशेवा यासह द्रोणागिरी, उलवे व विमानतळ अशी तीन नवी पोलीस स्टेशन तयार करण्यात येणार असून एकूण ९ पोलीस स्टेशन या तिसऱ्या परिमंडळामध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. याला पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यास दुजोरा दिला असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

  नवी मुंबईचा वाढता भौगोलिक विस्तार तसेच वाढती लोकसंख्या पाहता पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. त्यासोबत नवी मुंबईत सिडकोमर्फत तब्बल ९५ हजार घरांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासोबत खासगी विकासाकडून नवनवे प्रकल्प उभारणे सुरूच आहे. या सर्व गोष्टी पाहता नवी मुंबई पोलीस मुख्यालयांतर्गत असलेली लोकसंख्या वेगाने वाढणार आहे. सध्या स्थितीत नवी मुंबईची लोकसंख्या ही अंदाजे २५ लाख एवढी आहे. आणि पोलिसांची संख्या ही ५,१४१ आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेता गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नवीन पोलीस स्टेशन तयार करण्यात येत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येमागे पोलीस यंत्रणा देखील तितकीच सक्षम ठेवावी लागणार असून, त्याचा ताण पोलिसांवर पडू नये यासाठी आयुक्त भारंबे यांनी दूरदृष्टी दाखवत हा निर्णय घेतला आहे.

  कशी होणार विभागणी ?
  ऐरोली भाग वगळून त्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे केले जाणार आहे. घणसोलीत एक स्वतंत्र पोलीस ठाणे केले जाणार आहे, शिवाय झपाट्याने काम सुरू असलेल्या विमानतळ क्षेत्रासाठी स्वतंत्र विमानतळ पोलीस ठाणे होणार आहे. करंजाडेत एक स्वतंत्र करंजाडे पोलीस ठाणे होणार आहे. तर उलवा सारखा प्रचंड विस्तार असलेला उलवे परिसर हा एनआरआय पोलीस ठाणेच्या हद्दीतून वगळून त्यासाठी उलवा पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. तर द्रोणागिरी एक स्वतंत्र पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. तर उरण व मोरा हा दोन्ही पोलीस स्टेशन्स एकत्र करण्यात येणार आहेत

  नवी मुंबईत मोठमोठे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर पायाभूत सुविधा निर्माण होत असल्याने शहरीकरणासोबत लोकसंख्या देखील झापाट्याने वाढत असल्याने वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेता आणखी नवीन ५ पोलीस ठाणे निर्माण होत असल्याने नागरिकांना होणाऱ्या गुन्ह्यांच्या त्रासातून आणखी दिलासा मिळणार आहे.