प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी आहे. संगणक पदवी नसतानाही ज्या शिक्षकांनी ज्यादा पगार घेतला आहे त्या शिक्षकांकडून आता वसुली होणार आहे. 

    सोलापूर: जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी आहे. संगणक पदवी नसतानाही ज्या शिक्षकांनी ज्यादा पगार घेतला आहे त्या शिक्षकांकडून आता वसुली होणार आहे.
    पंचायत राज समिती 15 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे. या अनुषंगाने समितीने जिल्हा परिषदेच्या विभागनिहाय माहिती मागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील विविध योजनांचा खर्च तसेच शिक्षकांना दिलेला लाभाबाबतची माहिती समितीने मागवली आहे. यामध्ये एक धक्कादायक प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील काही शिक्षक संगणक पदवी घेतलेली नसतानाही पदवी आहे असे दाखवून ज्यादा पगार उचलला आहे. शिक्षणा विभागातर्फे विहित पदवी धारण करणाऱ्या शिक्षकांना ज्यादा पगार देण्याची तरतूद केलीली आहे. या तरतुदीचा फायदा घेत प्राथमिक शाळांमधील काही शिक्षकांनी संगणक पदवी धारण न करता पदवी घेतली आहे असे दाखवून ज्यादाचा पगार उचलला आहे. अशा शिक्षकांची बोगसगिरी पंचायत राज समितीपर्यंत पोहोचली असल्याचे दिसून आले आहे. संगणक पदवी धारण केलेली नसतानाही किती शिक्षकांनी असा पगार उचलला त्याबाबत समितीने माहिती मागवली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने अशा शिक्षकांचा शोध घेऊन आता पगार वसुलीची अंमलबजावणी करण्याची तयारी केली आहे. अशा शिक्षकांचा शोध घेण्यात कर्मचारी व्यस्त असल्याचे दिसून आले. असे सूत्रांनी सांगितले. पण शिक्षकांच्या बोगसगिरीवर काय कारवाई होणार हे आता पंचायतराज समितीच्या सूचनांवरून दिसून येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा बनला आहे.