ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नारा

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे 'ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!' चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिला.

  • कोथरूडमध्ये भाजपाचा विजयी जल्लोष

पुणे : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. त्यामुळे ‘ये तो बस्स झॉंकी हैं पुणे महापालिका बाकी हैं!’ चा नारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिला.

भाजपा कोथरूड मंडलच्या वतीने विजयी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आ. पाटील यांनी सहभागी होऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यानंतर आ. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी आ. माधुरी मिसाळ, पुणे शहर भाजपा अध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर सरचिटणीस दीपक पोटे, राजेश येनपूरे, दत्ताभाऊ खाडे, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्रबापू मानकर, पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कार्यकर्त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. या निवडणुकीत माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी जो डाव टाकला, त्यामुळे संजय राऊतांनाही चितपट व्हावे लागले.

तसेचं पुढे म्हणाले की ‘ये तो बस्स झॉंकी हैं २० तारीख बाकी हैं,’ म्हटलं होतं. पण आज ‘ये तो बस्स झॉंकी हैं, पुणे महापालिका बाकी हैं!’ हे आपल्याला दाखवायचे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षच पुन्हा विजयी होऊन पुणेकरांच्या सेवेत रुजू होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला‌.

दरम्यान, या विजयी जल्लोष कार्यक्रमात आ. पाटील यांनी भाजपचा ध्वज खांद्यावर घेऊन सर्व कार्यकर्त्यांसह गाण्यांच्या तालावर ठेका धरला; आणि त्यांच्या उत्साहात सहभाग घेतला. तसेच यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांकडून पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.