
पुण्यात मोबाईल चोरणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असताना मुंढवा पोलिसांनी गर्दीत नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश मिळवले आहे. या चोरट्याकडून तब्बल 31 मोबाईल जप्त केले असून, चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुणे : पुण्यात मोबाईल चोरणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला असताना मुंढवा पोलिसांनी गर्दीत नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश मिळवले आहे. या चोरट्याकडून तब्बल 31 मोबाईल जप्त केले असून, चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, इतर मोबाईलबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.
सतिश देवा हिरेकेरूर (वय 36, रा. घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून मुंढवा, मार्केटयार्ड व सहकारनगर पोलीस ठाण्यातील 3 गुन्हे उघड झाले आहेत.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप काकडे, सहाय्यक निरीक्षक संदिप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, पथकातील दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, निलेश पालवे, दिनेश राणे आणि त्यांच्या पथकाने केली.
शहरात मोबाईल हिसकावणाऱ्या तसेच गर्दीत, प्रवासात आणि बस स्थानक परिसरात मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज अनेक घटना घडत असल्याचे वास्तव आहे. मात्र, चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
मुंढवा पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करत होते. तेव्हा पथकाला माहिती मिळाली की, चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकजन आलेला आहे. त्यानूसार, पथकाने या परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी दिसताच त्याला पकडण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील बॅगेत पोलिसांना तब्बल 31 मोबाईल मिळून आले. त्याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याने हे मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन चोरल्याचे कबूल केले. चार मोबाईलबाबत पोलिसांत गुन्हे नोंद आहेत. इतर मोबाईलबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.