भर दिवसा चक्क पोलिसाच्या घरात घुसले चोरटे; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात एका पोलिस कर्मचार्‍याच्या घरात भर दिवसा चोरटयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम एक हजार रुपये चोरून नेले तर लॉकर तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शामराव उर्फ अमर दर्‍याप्पा शिंदे (रा. आंबे ता. पंढरपूर),शिवाजी भोसले, संतोष क्षीरसागर या तीघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

    मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील तुकाईनगर भागात एका पोलिस कर्मचार्‍याच्या घरात भर दिवसा चोरटयांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम एक हजार रुपये चोरून नेले तर लॉकर तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शामराव उर्फ अमर दर्‍याप्पा शिंदे (रा. आंबे ता. पंढरपूर),शिवाजी भोसले, संतोष क्षीरसागर या तीघांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,पोलिसांना एका चोरटयास फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडण्यात यश आले असून, अन्य दोघे फरार झाले आहेत.
    मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी पोलिस कर्मचारी निशिकांत येळे हे कामती पोलिस चौकीत कार्यरत असून त्यांनी 24 तास डयुटी केल्याने ते गुरुवारी घरी होते. दरम्यान फिर्यादी हे आजारी असल्याने (दि. 19) रोजी 9.00 वा. ते व त्यांची पत्नी पूजा हे डॉक्टर मेटकरी यांच्या हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी घराला कुलूप लावून गेले होते. फिर्यादी हे पुन्हा 10.45 वा. घरी आले त्यावेळी पत्नीने दरवाजाकडे पाहिले असता त्यांना कुलूप व कडी कोयंडा जागेवर दिसून आला नाही. त्यावेळी त्यांनी दरवाजा ढकलला असता आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्यांना घरामध्ये चोरटे असल्याचा संशय आल्याने शेजारी राहणारे पांडुरंग कांबळे,स्वप्नील पवार, विलास हत्ताळे, संतोष सुर्यवंशी यांना मदतीला बोलावले.
    तसेच पोलिस ठाण्यात फोन करून घरात चोर घुसल्याची माहिती देताच पोलिस निरिक्षक रणजित माने, सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल डमाळे, अंकुश वाघमोडे, पोलिस हवालदार महेश कोळी, महिला पोलिस हवालदार सुनिता चौरे व इतर पोलिसांचा फौजफाटा घेवून ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच घरात शिरलेला चोर तथा आरोपी शामराव उर्फ अमर दर्‍याप्पा शिंदे याने जिन्यातून छतावर जावून पाईपच्या सहाय्याने वरून खाली उडी मारून पलायन केले. यावेळी पोलिस निरिक्षक रणजित माने व इतर कर्मचार्‍यांनी त्या चोराचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अखेर एका ऊसाच्या फडात त्याच्यावर झडप घालून पकडले.
    इतर दोन त्याचे साथीदार बाहेर असल्याने ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. भर दिवसा चोरटे घरात घुसल्याची बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीकडे पोलिसांनी त्याच्या नावाची व गावाची माहिती विचारणा केली असता तो प्रथमतः नंदूर येथील असल्याचे सांगून उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने पोलिस अधिकार्‍यांनी बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल या म्हणीप्रमाणे नंदूर गावच्या पोलिस पाटलांनाच समक्ष बोलावून हा तुमच्या गावचा आहे का याची खात्री केली असता तो त्या गावचा नसल्याचे उघड झाले. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.