भरदिवसा घरफोड्या करणारे उत्तर प्रदेशातील चोरटे जेरबंद; पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांची कारवाई

पुणे शहरात भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना कोंढवा पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्यांना पकडण्यात आले असून, पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले.

  पुणे : पुणे शहरात भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांना कोंढवा पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्यांना पकडण्यात आले असून, पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडून तब्बल ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, विशाल मेमाणे, निलेश देसाई यांच्या पथकाने केली आहे. अहमद मुन्ना मलिक (वय ४९), यासीन अलीमुद्दीन मलिक (वय ४७, दोघे रा. मेरठ, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

  पुणे शहरात रात्रीसोबत दिवसा देखील बंद फ्लॅट फोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना चोरट्यांचा माग काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तत्पुर्वी उंड्रीत राजदिप कॉम्प्लेक्स सोसायटीत भरदिवसा फ्लॅट फोडत लाखोंचे दागिने चोरून नेण्यात आले होते. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध तपास पथक करत होते.

  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही पडताळले होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात होता. तेव्हा आरोपी अहमद आणि यासीन सय्यदनगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शाहीद शेख आणि संतोष बनसुडे यांना मिळाली होती. पथकाने येथे दाखल होत माहिती घेतली असता दोघांनी भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. खोली सोडून ते पसार झाल्याची माहिती मिळाली. दोघे जण पुणे रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशात पसार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले.

  चौकशीत दोघांनी लष्कर भागात देखील घरफोडी केल्याचे उघडकीस आले. आरोपींनी दोन घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लाख रुपयांची रोकड असा ८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

  भंगाराच्या दुकानात लपवून ठेवला मुद्देमाल

  आरोपींनी दोन घरफोड्या केल्यानंतर चोरलेला दोन लाख रूपये आणि सहा लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने असा एकूण आठ लाख रुपयांचा ऐवज हडपसर येथील एका भंगाराच्या दुकानात अडगळीत लपवून ठेवला होता. हा मुद्देमाल पोलिसांनी चौकशीनंतर जप्त केला आहे. ते दोघे पुणे स्थानक परिसरात आलेले होते. ते पळून जाण्याच्या तयारीत होते. पण, त्यापुर्वीच त्यांना पकडण्यात आले.