कोळगावात चोरट्यांचा धुडगूस; देवीच्या मंदिरासह दुकानांमध्ये चोरी

कोळगाव परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

    श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी एकाच रात्री कोळाई देवीचे मंदिर, कोळगाव फाट्यावरील बियर शॉप आणि किराणा दुकानाचे शटर तोडून सुमारे रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला. कोळगाव परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली असून, चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोळगावचे आराध्य दैवत कोळाईदेवी मंदिरात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून मंदिराची दानपेटी चोरुन नेली. या दानपेटीत सुमारे ४ हजार रुपये होते. त्यानंतर मंदिराच्या पायथ्याशी बाळासाहेब कोल्हे यांच्या संत कृपा या किराणा दुकानाचे शटरचे कुलुप तोडून दुकानातील १५ ते २० हजार रुपयांचे किराणा सामान चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा नगर दौंड महामार्गावर दीपक नलगे यांच्या मालकीच्या बियर शॉपीकडे वळविला. या शॉपीचे शटर उचकटून विविध कंपन्यांचे ८० हजार ते एक लाख रुपये किमतीचे बियरचे सुमारे १५ ते २० बॉक्स चोरुन नेले. चोरटयांनी एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या करून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास केला.

    पोलिसांनी केली घटनस्थळाची पाहणी

    बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र चाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत डॉगस्कोड आणि ठसे तज्ञांना पाचारण करत पुढील तपास सुरू केला.

    येत्या आठ दिवसांत कोळगाव येथील सर्व चोऱ्यांच्या तपास करून चोरट्यांना ताब्यात घेतले नाही तर बेलवंडी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

    अमित लगड, माजी उपसरपंच