ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ; वडगाव शेरीत सदनिका फोडल्या

ऐन दिवाळीत वडगाव शेरी भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका सोसायटीतील तीन सदनिकांचा दरवाजा उचकटून ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याच सोसायटीतील आणखी दोन सदनिकांचे कुलुप उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

    पुणे : ऐन दिवाळीत वडगाव शेरी भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका सोसायटीतील तीन सदनिकांचा दरवाजा उचकटून ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याच सोसायटीतील आणखी दोन सदनिकांचे कुलुप उचकटून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रसाद शेळके (रा. गणेश रेसीडन्सी, वडगाव शेरी ) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    दिवाळीनिमित्त शेळके त्यांच्या मूळगावी गेले आहेत. चोरट्यांनी शेळके, तसेच शेजारी असलेल्या दोन सदनिकांचे कुलूप तोडून रोकड आणि दागिने चोरले. तीन सदनिकांमधून चोरट्यांनी दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज लांबविला.

    गणेश रेसिडन्सी सोसायटीपासून काही अंतरावर असलेल्या जय विहार अपार्टमेंटमधील रहिवासी सोमेश कुलकर्णी आणि सूरज हगवणे यांच्या सदनिकांचे कुलुप चोरट्यांनी उचकटण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे तपास करत आहेत. दिवाळीत अनेकजण मूळगावी जातात. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करून चोरी करतात. ज्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच रखवालदार नाहीत, अशा सोसायट्यांमधील सदनिकांचे कुलुप तोडून ऐवज चोरून पसार होतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.