पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट; दुकानदाराला फसवून लाखांचा ऐवज चोरी; वाचा शहरातील धक्कादायक चोरीच्या अनेक घटना

  पुणे : पुण्यात प्रवासात, दुकानांमध्ये तसेच गर्दी आणि मेट्रोच्या साहित्यांची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा सुळसूळाट झाला आहे. दररोज या चोरट्यांकडून मोठा राडा घातला जात आहे.
  पहिल्या घटनेत येरवडा भागात किराणा माल दुकानदाराकडे बतावणीकरुन गल्ल्यातील रोकड व सोनसाखळी चोरून नेली. याबाबत येरवडा पोलिसांत जेष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यांचे येरवड्यातील नवी खडकीत सपना प्रोव्हीजन स्टोअर किराणा माल विक्री दुकान आहे. चोरटा दुकानात आला. त्याने किराणा माल दुकानदाराकडे नवीन नोटेची मागणी केली. पूजेसाठी नवी नोट हवी आहे, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर किराणा माल दुकानदाराला बोलण्यात गुंतविले. चोरट्यांनी दुकानदाराकडे सोनसाखळीची मागणी केली. सोनसाखळीला नवी नोट लावण्याचा बहाणा केला. त्यानंतर दुकानदाराचे लक्ष नसल्याची संधी साधत १० हजारांची रोकड आणि ९० हजारांची सोनसाखळी चोरून चोरटा पसार झाला.

  पीएमपी प्रवासी महिलेकडील ८९ हजारांचा ऐवज चोरी
  महापालिका भवन परिसरात पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने आणि अडीच हजार रुपयांची रोकड असा ८९ हजार ८३१ रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पोलिसांत  ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला बालेवाडी भागात राहायला आहेत. त्या पुणे महापालिका भवन भागात पीएमपी थांब्यावर बसची वाट पाहत थांबल्या होत्या. थांब्यावर गर्दी होती. बसमध्ये प्रवेश करताना ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. पोलीस कर्मचारी पवार तपास करत आहेत.

  मेट्रोचे साहित्य चोरीस
  शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मेट्रोचे पावणेचार लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मेट्रोतील पर्यवेक्षक शुभम साळवे (वय २६) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिवाजीनगर न्यायालयात शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गिकेचे काम सुरू आहे. कामगार पुतळ्याजवळ ठेवलेले पावणेचार लाख रुपयांचे बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी पुणेरी मेट्रोचे ३१ लाख रुपयांचे बांधकाम साहित्य बालेवाडी, गणेशखिंड रस्ता परिसरातून चोरून नेल्याची घटना घडली होती. पोलीस उपनिरीक्षक पी. बी. साळवे तपास करत आहेत.