कल्याण रेल्वे स्थानकात पैशांची बॅग चोरणारे चोरटे निघाले डिटोनेटर

धक्कादायक म्हणजे या दोघांनी पैशांसाठी एक बॅग चोरली मात्र त्याबागेत डिटोनेटर निघाल्याने त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून पसार झाले.

    कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर ठेवणाऱ्या दोन तरुणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. जॉय नायडू आणि ऋषिकेश निकुंभ असे या आरोपींची नावे आहेत. मात्र बॅग कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत. धक्कादायक म्हणजे या दोघांनी पैशांसाठी एक बॅग चोरली मात्र त्याबागेत डिटोनेटर निघाल्याने त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून पसार झाले.

    काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एक वर कार्टूनचे दोन बॉक्स सापडले होते. ज्यामध्ये 54 डिटोनेटर होते. कल्याण जीआरपी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. डीसीपी मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जीआरपी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी काही पोलीस पथक नेमले. या पथकाने आपले काम सुरू केले.

    सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांच्या तपास सुरू केला. अखेर कल्याण जीआरपी पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. एक तरुण जॉय नायडू बदलापूरला राहतो. तर ऋषिकेश निकुंभ हा भिवंडीला राहतो. जॉय याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निकुंभ यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. दोघे सराईत गुन्हेगार आहेत.

    धक्कादायक म्हणजे जॉय नायडू हा तरुण आपल्या एका मैत्रिणीला सोडण्यासाठी चेन्नईला गेला होता. मैत्रिणीला सोडून जॉय आणि ऋषिकेश पहाटेच्या सुमारास चेन्नई ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचले. त्यावेळी दोघांकडे पैसे नव्हते. दोघे कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहोचले त्यांनी झोपलेल्या एका प्रवाशाची बॅग चोरली. बॅग घेऊन फलाट क्रमांक एकवर आले. सरकते जिन्याच्या बाजूला अंधारात त्यांनी जेव्हा बँग चेक केली. त्यात दोन बॉक्समध्ये डिटोनेटर सापडले. यामुळे दोन्ही बॉक्स सोडून बॅगेतील इतर वस्तू घेऊन दोघे पसार झाले. या दोघांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात ज्या माणसाची या दोघांनी बॅग चोरली होती त्याच्या शोधात पोलीस आहेत.