सराईत चोरट्या महिलांना ठोकल्या बेड्या; विविध गुन्हे उघडकीस

कात्रज येथील शामगिरी ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी या महिलांनी प्रवेश केला. परंतु, हात चलाखीने (१८ सप्टेंबर) सोन साखळी चोरून नेली होती. दरम्यान, पोलिसांकडून तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजचे माध्यमातून या महिलांची माहिती घेतली.

    पुणे- सोने खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानात शिरून कामगारांची नजर चुकवून हातचलाखीने दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तर, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या येरवड्यातील एकाला देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    सुचित्रा किशोर साळुंखे (वय ५० रा. केशवनगर, मुंढवा ) आणि कोमल विनोद राठोड (वय ४५ रा अप्पर इंदीरानगर) अशी अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत. तर, सोने घेणाऱ्या अश्वीन सोळंकी (वय ४२, रा. येरवडा) याला अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

    कात्रज येथील शामगिरी ज्वेलर्समध्ये सोने खरेदीसाठी या महिलांनी प्रवेश केला. परंतु, हात चलाखीने (१८ सप्टेंबर) सोन साखळी चोरून नेली होती. दरम्यान, पोलिसांकडून तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजचे माध्यमातून या महिलांची माहिती घेतली. त्यावेळी पोलीस कर्मचारी मितेश चोरमोल व अभिनय चौधरी यांना सुचित्रा आणि कोमल यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली रविंद्र चिप्पा व पथकाने या महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोवा, वॉस्को, हैद्राबाद पंजगुटा, फलटण आणि कात्रज परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली. चोरलेल्या वस्तु त्या अश्वीन सोळंकी याला विकल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.