बारामतीमध्ये तिसरा उमेदवार?; माजी नगरसेवक विजय गव्हाळे उमेदवारी अर्ज भरणार

बारामतीमधील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    बारामती : यंदाची लोकसभा निवडणूक सर्वत्र गाजणार आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची लढत होणार आहे. यामध्ये आता तिसरा उमेदवार देखील दाखल झाला आहे. बारामतीमधील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत विजय गव्हाळे बोलत होते. यावेळी बोलताना गव्हाळे म्हणाले, सध्याची स्थिती ही विस्थापीत व प्रस्थापित यांच्या लढाईची असून मी विस्थापितांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविणार आहे. जे मतदार दोन्ही पवारांना कंटाळलेले आहेत, त्यांना एक समर्थ पर्याय म्हणून मी उमेदवारी दाखल करत आहे. राजकारणात कोणीच आपल्याला वरचढ होऊ नये याची काळजी पवार कुटुंबियांनी कायमच घेतली आहे, जनतेला वेठीस धरण्याचे, अनेक कर्तृत्ववान माणसे संपविण्याचे काम त्यांनी केले आहे. असा घणाघात अपक्ष उमेदवार विजय गव्हाळे यांनी केला.

    पुढे त्यांनी विकासकामांवरुन पवार कुटुंबाला लक्ष केले आहे. गव्हाळे म्हणाले, केवळ रस्ते करुन व इमारती बांधून विकास होत नाही, हा बेगडी विकास आहे, या ठिकाणचा 83 टक्के युवक हा सुशिक्षीत बेरोजगार आहे. हजारो लोक आजही झोपडपट्टीत राहतात, मात्र कालवा व नदी सुशोभिकरणावर कोटयवधींचा निधी पाण्यात घालविला आहे. उपेक्षितांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झालेले आहे.

    बारामतीचा विकास करताना तोडफोड, नुकसान या मुळे लोक विकासाला वैतागलेली आहेत. दूरदृष्टीचा विचार न करता विकासकामे सुरु आहेत. विकास केला तो फक्त शहराचाच, तालुक्यात काहीच विकासकामे झालेली नाहीत. दलित समाज घटकांना कोठेही स्थान दिले जात नाही, आमचा निधी सातत्याने पळवला जातो, असा आरोप करत मराठा व धनगर समाजासह आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी जाहीर करत असल्याचे विजय गव्हाळे यांनी सांगितले आहे.